चंद्रपूर :वाघाची शिकार प्रकरणात गाजत असलेल्या बहेलिया टोळीच्या मुसक्या आवळण्यात सावली वनविभागाला अखेर यश आले आहे. सावली वनविभागाच्या चमूंनी या आरोपींचा शोध घेत चक्क गुवाहाटी गाठून तिघांना मंगळवारी अटक केली. रूमाली बावरीया (४८), राजू सिंग (३६) व सोनू सिंग (३८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सावली वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात वाघाच्या शिकारप्रकरणी आंबेशिवणी येथून काही आरोपींना अटक केल्यानंतर या प्रकरणाची तार बहेलिया टोळीशी जुळल्याचे समोर आले होते. दरम्यान, सावली वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या राजोली फाल येथे वाघाची शिकार झाल्याचे समोर आले होते. यामध्येही याच टोळीचा हात असल्याचा संशय होता. दरम्यान, सावली वनविभागाच्या चमूंनी यासंदर्भात तपासाची चक्रे फिरवली होती. या प्रकरणाचा तपास करताना सावली वनविभागाच्या चमूने आसाम राज्यातील गुवाहाटी गाठून रूमाली बावरीया, राजू सिंग, सोनू सिंग या तिघांना मंगळवारी अटक केली. तिघांनाही सावली न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी तिघांनाही वनकोठडी सुनावली.
बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू
तिघांनाही वनकोठडी मिळाल्यानंतर सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर यांच्या नेतृत्वात सायंकाळपर्यंत बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार या टोळीने पुन्हा कुठे इतर वन्यप्राण्याची शिकार केली की काय, ही बाब समोर येऊ शकते.
गडचिरोली येथून वाघ शिकार प्रकरण समोर येताच गडचिरोली पोलिसांनी १६ जणांना अटक केली होती. या बहेलिया टोळी संपूर्ण देशभरात पसरली असल्याचा संशय येताच या शिकार प्रकरणाच्या तपासाकरिता वनविभागाने स्पेशल टास्क फोर्स गठीत केली होती. या टास्क फोर्समध्ये वन अधिकाऱ्यांचाही समावेश होता, अशी माहिती आहे.