चंद्रपूर : नरभक्षक झालेल्या अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याच्या घटनेचा धुराळा खाली बसत नाही तोच चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे मार्गावर वाघाचे तीन बछडे रेल्वेखाली ठार झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. सुरवातीला दोनच बछडे ठार झाल्याची बातमी आल्याने ते अवनीचेच असणार असे गृहित धरुन दिल्लीपर्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशलमीडीयावरुनही संताप व्यक्त झाला. परंतु, तीन बछडे ठार झाले असून त् अवनीचे नाहीत, असे वनविभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. तीनही बछडे सहा ते आठ महिन्यांचे असून त्यातील दोन बछडे मादी होते.
चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे गाडी सकाळी जुनोना जंगलातून केळझरकडे जात असताना लोहारा ते चिचपल्ली दरम्यानच्या रुळांवर दोन बछडे मरुण पडल्याचे रेल्वेचालकाला दिसले. केळझर रेल्वे स्थानक येताच ‘रेल्वे रुळावर वाघाचे दोन बछडे पडून होते. त्यावरून रेल्वे गेली नाही’, अशी नोंद त्याने केली. या मार्गावरून रात्रीच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना त्यांना रेल्वेने धडक दिली असावी, असा अंदाज आहे.घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक ऋषीकेश रंजन यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन बछड्यांचे मृतदेह रेल्वे रुळाच्या मधोमध पडले होते. जवळच एक पाय वेगळा तुटून पडला होता.