लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोळसा काढताना मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कोळसा काढण्यासाठी खाणीत असलेल्या तीन ड्रील मशीन, १ पंप आणि ओसीबी पूर्णत: ढिगाऱ्याखाली दबल्या. ही घटना बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास येथून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावर असलेल्या पद्मापूर सेक्टर ४ या खुल्या कोळसा खाणीत घडली. यात वेकोलिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.खुल्या खाणीतून कोळसा काढण्याचे काम सुरू असताना दुपारच्या भोजनाची वेळ झाल्याने काही कामगार तेथून बाहेर निघाले होते. काहीजण तिथेच होते. कोळसा उत्खननासाठी आधी तेथील माती काढावी लागते. ही माती बाजूलाच टाकली जाते. यामुळे मातीचे महाकाय ढिगारे खाणीच्या सभाेवताल तयार झाले आहेत. यातील एका बाजूच्या ढिगाऱ्याची माती खचत असल्याचे काही कामगारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तेथून पळ काढला. यामुळे ते थोडक्यात बचावले.