लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती, पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान बिरसा मुंडा, तर बल्लारपूर येथील शासकीय औद्योगिक संस्थेला राणी हिराई असे नाव देण्यात आले आहे. या सर्व आयटीआयचा नामकरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.
यासंदर्भात, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती. राज्य सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शौर्याचे प्रतीक असलेल्या महान व्यक्तिमत्त्वांची नावे दिल्याने भावी पिढीला तसेच तरुणांना प्रेरणा मिळेल. त्यांना आपल्या सामाजिक जबाबदारीची कायम जाणीव राहील, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त आहे.
चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील गोंड साम्राज्याची धुरा यशस्वीरीत्या सांभाळणाऱ्या आणि अफाट शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी हिराई यांचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिले आहे. राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा, राणी हिराई या तिनही महान व्यक्तिमत्त्वाचे नाव जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर मुलींच्या आयटीआयमध्ये सोहळा चंद्रपूर येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे राणी दुर्गावती असे नामकरण करण्यात आले. यानिमित्त रविवारी आभासी पद्धतीने नामकरण सोहळा पार पडला. चंद्रपूर येथील मुलींच्या आयटीआयमध्ये नामकरण सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांच्यासह शिक्षक, निदेशक, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पेढा भरवून सर्वत्र आंदन व्यक्त करण्यात आला.