घनश्याम नवघडे
नागभीड : ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्यापासून ग्रामपंचायतीसंदर्भातील अनेक गमतीजमती समोर येत असून त्यांची चवीने चर्चाही होत आहे. नागभीड तालुक्यातील कुनघाडा चक हे असेच एक गाव असून, या गावाची तीन ग्रामपंचायतींमध्ये विभागणी करण्यात आल्याने हे गाव चांगलेच चर्चेत आले आहे.
कुनघाडा चक हे गाव काही रिठांमध्ये विभागल्या गेले असले तरी लौकिक अर्थाने एकच गाव आहे. हे नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या जी काही अतिसंवेदनशील गावे आहेत त्यातील मोहाळी मोकासा या गावाला हे गाव अगदी लागून आहे. सुप्रसिद्ध पांडवगुफा याच कुनघाडा गावात आहेत. कुनघाडा चक या गावाचा मोहाळी मोकासा या ग्रामपंचायतीत समावेश करण्यात आला असता तर प्रशासकीयदृष्ट्या लोकांना अतिशय सोयीचे झाले असते. मात्र या गावाचे तीन ग्रामपंचायतींमध्ये विभाजन करण्यात आले आहे. कुनघाडा चकचा अधिकांश भाग जवळजवळ चार किमी अंतरावर असलेल्या बिकली ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्यात आला आहे. तर या गावापासून तीन किमीवर पेंढरी बरड ही ग्रामपंचायत आहे. पेंढरी या महसुली गावाची सीमा कुनघाडा चक या गावापर्यंत पोहचली असल्याने, कुनघाडा चकचा एक पूर्ण मोहल्लाच पेंढरी बरड या ग्रामपंचायतीला जोडण्यात आला आहे. या मोहल्ल्यात ७० ते ८० मतदार असल्याची माहिती आहे. तर मोहाळीमध्ये कुनघाडा चकचे १०० ते १२५ मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. आता कुनघाडा चक येथील नागरिकांना एखाद्या कामाची गरज पडली की ज्या गावात त्यांचे नाव समाविष्ट आहे, त्या गावात पायपीट करून कामासाठी जावे लागते. वास्तविक या गावास मोहाळी मोकासा हे गाव अतिशय जवळ आहे. या गावाचा मोहाळीत समावेश करावा, नाही तर ही तिन्ही गावे मिळून एक स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली तर नागरिकांना अतिशय सोयीस्कर होऊ शकते.
बॉक्स
पारडी, कोसंबीचेही असेच
नागभीड तालुक्यातील कोसंबी गवळी या गावाचीही हीच गोष्ट. कोसंबी गवळी या गावातील जवळपास १२५ मतदारांची तीन किमी अंतरावर असलेल्या पारडी ठवरे या ग्रामपंचायतींच्या मतदार यादीत नोंद आहे. उल्लेखनीय बाब ही की पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी हेच मतदार गावातच म्हणजे कोसंबी गवळी येथे मतदान करतात आणि नेमक्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी या मतदारांची पारडी ठवरे या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नोंद होते. हे असे १५ ते २० वर्षांपासून सुरू आहे. ग्रा.पं. निवडणुकीच्या वेळी आमची नावे कोसंबी गवळी ग्रामपंचायतच्या मतदार यादीत आली पाहिजेत म्हणून कोसंबी गवळीवासीयांनी अनेकदा आवाज उठविला. ग्रा.पं.च्या निवडणुकीवर यापूर्वी बहिष्कारही टाकला, पण त्यांना न्याय मिळाला नाही.