घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्क नागभीड: येथील गटविकास अधिकाऱ्यांचे पद सहा महिन्यांपासून रिक्त आहे. याचा पदभार पुन्हा प्रभारींकडेच सोपविण्यात आला. सहा महिन्यांत तिसऱ्या गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे प्रशासकीय गतिमानतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
नियमित गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे यांचे स्थानांतरण झाल्यानंतर लाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या रुजू झाल्या नाहीत. परिणामी, गटविकास अधिकाऱ्यांचा प्रभार सिंदेवाहीचे गटविकास अधिकारी शुक्रे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनी जुलै महिन्यापर्यंत कारभार पाहिला. दरम्यान त्यांचेही स्थानांतरण झाल्याने सावली येथील मधुकर वासनिक यांच्याकडे पद सोपविण्यात आले. वासनिक यांना प्रभार घेऊन सव्वा महिना होत नाही तोच, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय कारण देत ८ ऑगस्ट २०२४ रोजी एक आदेश जारी केला. त्यानुसार चंद्रपूर येथील सहायक गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांची या पदावर नियुक्ती केली. आता चव्हाण यांच्याकडे हा प्रभार किती दिवस राहतो याकडे नागरिकांचे लक्ष आहे. विकास कामांना न्याय देण्यासाठी येथे पूर्णवेळ गटविकास अधिकारी नियुक्त नसल्याने प्रशासकीय गतिमानतेचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे
शिक्षण विभागात पूर्ण वेळ नाही अधिकारीमागील सहा सात वर्षांपासून येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांचेही पद रिक्त आहे. मधल्या काळात हे पद फक्त एकदाच भरण्यात आले होते. गतवर्षी पूर्णवेळ गटशिक्षण अधिकारी सेवानिवृत्त झाले. या पदाचाही प्रभार शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. आठ वर्षांपासून हेच सुरू आहे, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे प्रभार देऊन वेळ निभावून नेण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांवर उरला नाही वचक
- नागभीड पंचायत समितीत पूर्णवेळ गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती न करता नेहमी प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कारभार दिला जात आहे. त्यामुळे विकासकामांवर परिणाम झाला. पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक नाही.
- मनमानीपणा वाढला. हजेरी लावल्यानंतर नियमित कर्तव्य बजावणारे दुर्मीळ झाले. त्यामुळे कामे घेऊन येणारे नागरिक व सरपंचांची कामे वेळेवर होत नाहीत, असा आरोप मेंढ्याचे सरपंच व तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आनंद कोरे यांनी केला.