लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर (तुकूम) जंगलात तेंदूपत्ता तोडताना वाघाच्या हल्ल्यात एक तर चिमूर तालुक्यातील अमरपुरी (भांसुली) जंगलात अस्वलाने हल्ला केल्याने दोन मजूर जखमी झाले. ही घटना बुधवारी घडली. दादाजी पाटील बोरकर (६२) रा. जाटलापूर, विठ्ठल किचू रणदिवे (५०) व बाजीराव भिका रणदिवे रा. अमरपुरी (भांसुली) अशी जखमींची नावे आहेत. विठ्ठल रणदिवे यांची प्रकृती गंभीर असल्याने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.दादाजी पाटील हे सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी सकाळी जाटलापूर जंगलात गेले होते. दरम्यान, वाघाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असणाऱ्या मजुरांनी पाटील यांना सिंदेवाही येथील ग्रामीण रूग्णालयात भरती केले. डॉ. मने यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहे. दुसºया घटनेत विठ्ठल रणदिवे व बाजीराव रणदिवे हे सहकाऱ्यांसह गावलगतच्या वन कक्ष क्र. ८ मध्ये तेंदूपत्ता तोडणीकरिता गेले असता सकाळी ९.०० वाजताच्या सुमारास अस्वलाने प्रथम विठ्ठल रणदिवे यांच्यावर हल्ला चढविला. बाजीराव रणदिवे यांनी हे दृश्य बघताच अस्वलाला पिटाळून लावण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही अस्वलाने ओरबाडले. जवळच असलेल्या मजुरांनी आरडाओरडा केल्याने अस्वल जंगलात पळाली. घटनेची माहिती मिळताच मुरपार येथील वनक्षेत्र सहाय्यक इ. एल. नन्नावरे हे कर्मचाºयांसह दाखल झाले. जखमींना चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, विठ्ठल रणदिवे यांची प्रकृती गंभीर असल्याने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.