आवाळपूर (चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील आवाळपूर परिसरात असलेल्या अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या कृत्रिम तलावातील डबक्यात तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, शुक्रवारी तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले.
पारस सचिन गोवारदिपे (१०), दर्शन शंकर बशाशंकर (१०) व अर्जुन सुनील सिंग (१०) तिघेही रा.अल्ट्राटेक कंपनी वसाहत अशी मृतकांची नावे आहेत. हे तिघेही आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये चवथ्या वर्गात शिकत होते. गुरुवारी गणराज्य दिनाच्या दिवशी पारस, दर्शन व अर्जुन ही मुले कृत्रिम तलावामध्ये संध्याकाळच्या वेळेला पोहण्यासाठी गेली. मात्र, अंधार पडल्यानंतरही घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध केली असता, तलावाच्या काठावर तीनही मुलांच्या चपला आणि कपडे आढळून आले. त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाला पाचारण करून पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधाशोध सुरू झाली. मात्र, पाणी अथांग असल्यामुळे शिवाय रात्रीचा वेळ असल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.
शुक्रवारला पोलिस प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलावण्यात आली. त्यांच्या माध्यमातून अवघ्या दोन तासांमध्ये तळाशी असलेल्या गाळात फसून असलेल्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोकाकूल वातावरण तयार झाले आहे. पुढील तपास गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजीत आमले पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, जमादार संदीप अडकिने व त्यांचे सहकारी करीत आहे.
सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे
अल्ट्राटेक कंपनीने खोदलेल्या तलावात तीन कोवळ्या मुलांचा जीव गेल्याने सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून खोदलेल्या या तलावातून माती उपसण्यात आल्याने डोह तयार झाला. शिवाय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कर्मचारी तैनात नसल्यामुळे वा सुरक्षाविषयक कोणताही सांकेतिक चिन्ह वा खुणा या ठिकाणी लावल्या नसल्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले येथे खेळण्यासाठी जातात.
अल्ट्राटेक परिसरामध्ये घडलेल्या घटनेस कंपनी प्रशासन हेच जबाबदार असून, त्यांनी खणलेल्या मानवनिर्मित तलावाची अनेकांना माहितीही नाही, शिवाय तलावाच्या सभोवताल कोणत्याही प्रकारचा सुरक्षा कर्मचारी किंवा सुरक्षाविषयक सांकेतिक धोक्याची घंटा असल्याचे चिन्ह दिसत नाही. त्यामुळेच ही घटना घडली. कंपनी प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
- साईनाथ बुचे, महासचिव, एल अँड टी कामगार संघटना.