चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ‘जीवघेणी बेशिस्त वाहतूक’ चंद्रपूरकरांसाठी कशी धोकादायक ठरत आहे, हे स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून ‘लोकमत’ने शुक्रवारी समोर आणली. वृत्त प्रकाशित होताच आज वाहतूक शाखेचे अधिकारी खडबडून जागे झाले आणि तीन बंद सिग्नल सुरु करण्यात आले. तर शिपायी तैनात नसणाऱ्या सहा चौकांमध्ये वाहतूक शिपाई तैनात करण्यात आले. स्टिंग आॅपरेशन दरम्यान अनेक चौकातील वाहतूक दिवे बंद होते. तर काही चौकात वाहतूक पोलीस तैनात नव्हते. काही वाहतूक पोलीस उन्हापासून बचाव करत इमारतीचा आडोसा घेतलेले दिसले. याचा फायदा घेत अनेक वाहनधारक सिग्नल तोडून पळतात. वाहनधारकाच्या मनमर्जीमुळे पादचारी व इतरांसाठी क्षणाक्षणाला कसा धोका निर्माण होतो. मुख्य चौकांमध्ये वाहतूक व्यवस्थेचे कसे धिंडवडे काढले जाते, हे ‘लोकमत’ने समोर आणले. त्यामुळे आज वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले. वाहतूक पोलिसांना मास्क व टोपींचे वाटप करुन पूर्ण वेळ सिग्नलजवळ उभे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. चौकातील पाळी संपल्यावर पुढील शिपाई येईपर्यंत पार्इंट सोडू नये, अशा सूचनाही वरिष्ठांनी शिपायांना दिल्या.
तीन बंद वाहतूक दिवे सुरु
By admin | Published: January 17, 2015 2:07 AM