भद्रावती : विशेष वसुली मोहिमेंतर्गत भद्रावती नगरपालिका क्षेत्रातील थकित मालमत्ता कर, पाणी पट्टी व थकित भाडे वसुलीकरिता भद्रावती नगरपरिषदेने जप्ती कारवाई सुरू केली आहे. एक लाख ८०० रुपयांच्या थकबाकीपोटी स्वत:च्याच मालकीच्या तीन दुकानगाळ्यांना पालिकेने आज गुरुवारी सील ठोकून जप्तीची कारवाई केली. मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनात नगरपालिकेच्या राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात ही कारवाई करण्यात आली. येथील तळघर गाळा क्रमांक ०१ वर ४२ हजार ३०० रुपये, तळघर गाळा क्रमांक २५ वर २२ हजार रुपये तर तळ मजला गाळा क्रमांक ३ वर ३७ हजार ५०० रुपये इतकी थकबाकी होती. भद्रावती नगरपालिकेने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९९५ च्या कलम १५२ अन्वये सदर कारवाई करण्यात आली. ही मोहीम राबविण्याकरिता तीन स्वतंत्र जप्ती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. आजची कारवाई वारंट अधिकारी पारखी, सहाय्यक च.तू. शेडमाके, इरशाद अहमद बेग यांच्या पथकाने केली. मालमत्ता व पाणी पट्टी कर वसुलीमध्ये भद्रावती नगरपालिका इतर नगरपालिकेच्या तुलनेत बरीच मागे आहे. विकासाकरिता निधी प्राप्त करायचा असेल तर कराची वसुली ९० टक्के पेक्षा जास्त करावी लागते. सद्यस्थितीत नगरपालिकेची करवसुली केवळ ५५ टक्केच आहे. उर्वरित करवसुली पालिकेला या एका महिन्यात पूर्ण करायची आहे. प्रशासकीय कामकाजाच्या मुल्यमापनात कराची वसुली खूप कमी असल्यामुळे सन २०१५-१६ मध्ये भद्रावती नगरपालिकेला कमी गुणांक प्राप्त झाले आहे. याचा प्रतिकूल परिणाम मिळणारा निधी, अनुदान व पर्यायाने विकासावर होणार आहे. त्यामुळे ही धडम मोहीम राबविण्यात येत असल्याचे पालिकेच्या सुत्राने सांगितले. सदर कारवाई टप्प्याटप्प्याने व्यापारी संकूल, गाळेधारक, भद्रनागमंदिर, व्यापारी गाळे, बंगालीधारकांचे गाळे, मंगल कार्यालये, हॉटेल्स, रेस्टारंट, पेट्रोलपंप, गोडावून, शासकीय कार्यालये, मोबाईल टॉवर आदींवर केली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
स्वत:च्या मालकीच्या तीन गाळ्यांना पालिकेनेच ठोकले सील
By admin | Published: March 03, 2017 12:54 AM