राजकुमार चुनारकर
चिमूर : दीड वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळेची घंटा बंदच आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शाळेचे शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणपद्धतीमुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे तीन तेरा वाजले आहेत. मोबाईलमधील ऑनलाईन गेममध्ये मुले रमल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विसर पडत आहे. कोरोना नियमांमध्ये शाळा सुरू करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
गतवर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. मात्र ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे. विद्यार्थी बाराखडी व पाढे विसरले असून सोबतच पुढे शाळा सुरळीत सुरू झाल्यानंतर शाळेत सहज जातील की नाही अशीही शंका पालकांच्या मनात घर करत आहे.
विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रत्यक्षात ऑनलाईन प्रभावी राहिले नसून शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल पडला की, मुले पे गेम, कार्टून यासारख्या खेळात रंगू लागले आहेत. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण अधिक प्रभावी असल्याने मुलांना उजळणी, तोंडपाठ होते. मात्र सध्या चौथी-पाचवीच्या मुलांना गुणाकार, भागाकार कसा करावा याचाही विसर पडला आहे.
बॉक्स
पुस्तके उघडूनही बघितली नाही
जून महिन्यात शाळांकडून पाठ्यपुस्तकांचे वाटप झाले. मात्र कोणत्याही विषयाचे पान उघडून न पाहणाऱ्या मुलांना यंदाच्या अभ्यासात कोणते धडे अभ्यासासाठी आहेत, याची माहितीही नाही. ऑनलाईन शिक्षण केवळ बोटावर मोजता येईल इतके विद्यार्थी करीत असावेत. परंतु इतरांचे काय? त्यातही यावर्षी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणखीनच बिनधास्त झाले आहेत. परीक्षाच नाही तर अभ्यास कशाला करायचा, असे प्रतिउत्तर मुले आपल्या पालकांना देऊ लागली आहेत.
कोट
ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्याला खूप मर्यादा आहेत. सेतू चाचणीच्या वेळी ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा प्रकर्षाने जाणवल्या. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावली आहे. शासनाने कोरोनामुक्त गावातील, वाड्यावस्त्यांवरील तसेच कमी पटाच्या शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, हीच अपेक्षा आहे.
-सुरेश डांगे,
जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना, चिमूर