लोकमत न्युज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढली. रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात खाटा कमी पडू लागल्या. अशातच आरोग्य विभागाने रुग्णांसमोर होम आयसोलेशनचा पर्याय ठेवला. याचा हजारो रुग्ण लाभ घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ५४१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. यातील काही जण कोरोनातून मुक्तही झाले आहेत. चंद्रपूर शहरातील १७३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. बल्लारपूर तालुक्यातील ३३०, राजुरा ८८, कोरपना ८२, जिवती १, गोंडपिंपरी २७, मूल ३३०, सावली २२, नागभीड १७४, सिंदेवाही २, ब्रह्मपुरी २३६, चिमूर ११९, वरोरा १५६, भद्रावती तालुक्यातील २५४ रुग्ण घरीच राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध व्हावे व त्यासोबतच योग्य व्यवस्थापनाद्वारे आजाराचे संक्रमण खंडित व्हावे, यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार शासनाने गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) हा सक्षम पर्याय उपलब्ध करुन दिला असून त्यासाठी रुग्णांनी व त्याच्या नातेवाईकांनी पूर्ण सहकार्य करणे अपेक्षित आहे. वास्तविक पाहता कोविडची लागण झालेल्या साधारण ६० ते ७० टक्के रुग्णांना कोणतेही लक्षणे दिसून येत नाही किंवा अतिशय सौम्य लक्षणे आढळतात. अशा रुग्णांना कोविड रुग्णालयात तातडीने भरती होण्याची गरज भासत नाही. असे रुग्ण डॉक्टरांनी परवानगी दिली तर घरीच विलगीकरणात राहून स्वयंम देखरेख व योग्य औषध उपचाराने बरे होऊ शकतात. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी तीन हजार ५११ रुग्णांनी घरीच राहून उपचार घेतला आहे. यातील अनेक रुग्ण आता कोरोनातून बरेही झाले आहेत.
अशा आहेत अटीगृह विलगिकरणाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णास कोविडची लक्षणे नाहीत किंवा अति सौम्य लक्षणे असल्याचे व याबरोबरच रुग्णास इतर गंभीर आजार नसल्याचे (कोमॉर्बिडिटी) डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. संबंधित रुग्णाच्या घरी त्याच्या विलगिकरणासाठी तसेच कुटुंबातील इतर व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी (होम क्वारंटाईन) योग्य सोई सुविधा व घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबंधित काळजी वाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दुरध्वनी/मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य आहे. आरोग्य सेतू अप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारत असलेल्या रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी व त्यांना सेवा देत असलेल्या डॉक्टरांनी ही एक सामाजिक जाबाबदारी व कर्तव्य समजून प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे. पात्र रुग्णांनी गृह विलगिकरणात असताना आपल्या कुटुंबीयांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची पुर्णपणे दक्षता घ्यावी.-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी,चंद्रपूर.
डाॅक्टरांचे रुग्णावर असते बारिक लक्ष
होम आयसोलेशनमध्ये रुग्णांवर संबंधित डाॅक्टरांना बारिक लक्ष द्यावे लागते. दररोज रुग्णांशी मोबाईलवरून ते संपर्क साधतात. ऑक्सीमीटरची रिडींग तपासतात. त्यावरून रुग्णांवर उपचार केला जातो.