नागरिकांत संताप : चारचाकीला मोजावे लागतात अडीचशे रुपयेचंद्रपूर : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील देवळीनाका वगळता अन्य कुठलेही नाके बंद करण्यात आले नाही. चंद्रपूर- नागपूर मार्गावर तीन टोलनाके पडतात. या तिन्ही नाक्यांवरुन एका चारचाकीधारकास तब्बल २५० रुपये मोजावे लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या या तिहेरी टोल भाराविरोधात नागिरकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर ते नागपूरचे अंतर जवळपास १६० किमी आहे. या मार्गावर पूर्वी ताडाळी टोलच होता. याच टोलवर चारचाकी वाहनधारकास पैसे भरावे लागत होते. काही वर्षे हा एकमेव टोल सुरू होता. आज ही परिस्थिती बदलली आहे. तब्बल तीन टोलनाके चंद्रपूर- नागपूर मार्गावर उभारण्यात आले आहेत. यातून मोठी लूट वाहनधारकांची सुरू आहे. आज चंद्रपूर ते नागपूर खासगी वाहनाने प्रवास करावयाचा झाल्यास एका चारचाकीला किमान २५० रुपये मोजावे लागतात. बोरखेडी येथील नाक्यावर नागपूरच्या बाहेर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बायपास रस्त्याचाही टोल घेण्यात येतो. परंतु ज्यांना फक्त नागपुरातच जायचे आहे. त्यांनाही सूट देण्यात येत नाही. चौदा वर्षांपासून सुरू असलेला ताडाळीचा टोलनाका, नव्याचे उभारण्यात आलेला नंदोरी येथील टोेल आणि बोरखेडी येथील जादाचा टोलनाका, असा तिहेरी फटका चंद्रपूरकरांना बसत आहे. याविरोधात संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत. याचा सर्वाधिक फटका येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र नागपूर विभागातील एकमेव नाका बंद करण्यात आला. चंद्रपूर- नागपूर मार्गावरील एकही टोलनाके बंद न करण्यात आले नाही. (शहर प्रतिनिधी)
तीन टोलनाक्याचा चंद्रपूरकरांवर भार
By admin | Published: June 16, 2014 11:25 PM