लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबातील बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात गुरे चारत असताना अचानक वाघाने गुराख्यावर हल्ला केला. यात गुराखी जखमी झाला. मात्र अशाही अवस्थेत त्यांनी धाडस दाखवत आपल्याजवळील कुऱ्हाड काढून वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे घाबरून वाघ जंगलात पसार झाला. ही घटना कक्ष क्रमांक ५७० मध्ये रविवारी घडली.तेजराम किसन नागपुरे रा. वासेरा असे जखमी गुराख्याचे नाव आहे. शिवनी वनपरिक्षेत्रातील वासेरा क्षेत्रातील कक्ष क्रमांक ५७० मध्ये तेजराम नागपुरे हा स्वत:चे गुरेढोरे चराईकरिता गेला असता तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने तेजरामवर हल्ला केला. त्यांच्या पाठीवर पंजा मारला. यात तेजराम जखमी झाले. तरीही त्यांनी समयसूचकता दाखवत आपल्या जवळ असलेल्या कुऱ्हाडीने वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे घाबरून वाघ जंगलात पसार झाला. लगेच ही माहिती गावातील युवकांना देण्यात आली. युवकांनी वनविभागाला माहिती दिली.वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे, वनपाल चिकाटे, वनरक्षक सुरेश मेश्राम, एस.एस. टापरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व जखमी तेजराम यांना सिंदेवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
वयोवृद्ध गुराख्यावर वाघाचा हल्ला; जखमी अवस्थेत कुऱ्हाडीने पिटाळून लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 11:16 AM