चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड मधील वसाहतीत वाघाने आपले स्थान मांडल्याने एकच दहशत पसरली आहे.अनेक कामगारांना वाघाचे दर्शन झाले असून जंगल नसतानाही वसाहतीत वाघ शिरल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दीड वर्षापूर्वी याच वसाहतीतून बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले होते.
तीन शिफ्टमध्ये कामगार या वसाहतीतून कंपनीमध्ये जाण्याकरिता ये-जा करीत असतात अनेक कामगारांच्या निदर्शनात वाघ आल्याचे कामगार सांगत आहे. एका युवकाने तर वसाहतीत असलेल्या वाघाचा चक्क व्हिडीओच काढला. हा व्हिडीओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला असून वाघ असल्याचे निष्पन्न सुद्धा झाले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी गस्त वाढवली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यासंबंधी माहिती देऊन वाघ दिसल्याच्या चर्चेपासून तर आतापर्यंत वनविभाग व कंपनी प्रशासनाच्या संपर्कात आहो. वन विभागाकडून वाघ असल्याची पुष्टी मिळाली आहे.- गोपाल भारती ठाणेदार, गडचांदूर
नांदाफाटा येथून कंपनीमध्ये प्रवेश केल्यानंतर गेट क्रमांक २ जवळ सिमेंटची तोफ ठेवलेली आहे या तोफेपासून वाघाने उडी मारली. आणि झुडूपामध्ये गेला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी व सुरक्षारक्षकांनी सुद्धा वाघ बघितल्याची विश्वसनीय माहिती आहे.
अल्ट्राटेक मध्ये वाघ असल्याची पुष्टी झालेली आहे. नोकारी, पालगाव, बाखर्डीमार्गे वाघाने अल्ट्राटेकमध्ये प्रवेश केला आहे. परिसरातील दोन ते तीन गुरांना त्याने जखमी केले असून काल अल्ट्राटेकमध्ये प्रवेश केला आहे. वनविभाग वाघाला पकडण्यात सतत प्रयत्नशील असून अल्ट्राटेकमध्ये तीन कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहे. नागरिकांनी वाघाला ताब्यात घेईपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.- बी.सी. ब्रह्मटेके क्षेत्र सहायक, वनविभाग गडचांदूर
कंपनी प्रशासनाने घेतला धसका
गेल्या दीड वर्षापूर्वी बिबट्या आणि आता वाघाने धुमाकूळ घातल्याने कंपनी प्रशासनाने धसका घेतला असून वसाहतीतील कामगारांना सतर्क राहण्यासाठी ठीक ठिकाणी सूचना दिल्या जात आहे. लाऊड स्पीकरच्या माध्यमातून लोकांना या संदर्भात माहिती देण्यात येत आहे.