लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर-पूर्वी काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होती. ती ओळख आता पुसली जात असून केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात चंद्रपूरची व्याघ्रभूमी अर्थात ‘टायगर लॅन्ड’ म्हणून ओळख झाली आहे. सध्या भारतात सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात असून येथील वाघाचा जन्मदर हा उच्चस्तरावरील आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बहुतांश वाघिण साधारणत: एकावेळी चार पिल्लांना जन्म देते. हमखास व्याघ्रदर्शनामुळे जगभरातील पर्यटकांचे पाऊल सध्या चंद्रपूरच्या या व्याघ्रभूमीकडे वळत आहेत. यामागे राज्य सरकारने अर्थातच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसहभागातून राबविलेल्या विविध उपक्रमांचाही वाटा मोठा आहे.पर्यटन उद्योगातून मोठा महसूलचार वर्षापूर्वी राज्य सरकारने चंद्रपूरात दारू बंदी केली. या बंदीमुळे जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडल्याची ओरड केली जात होती. मात्र वाघांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूरच्या महसूलामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे. विशेष म्हणजे, परदेशी पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जगभरातील पर्यटक येथे भेट देत आहेत. इतर उद्योगांच्या तुलनेमध्ये पर्यटन उद्योगातून निसर्गाला कोणत्याही प्रकारे धोका नसून त्यातून जास्त प्रमाणात फायदाच होत आहे.वाघांमुळे मिळाल्या रोजगारांच्या संधीपर्यटनाला चालना मिळाल्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी असणाऱ्या जमिनीच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अत्याधूनिक सोयीसुविधा असलेले रिसार्र्ट येथे उपलब्ध आहे. या माध्यमातून परिसरातील नागरिकांना रोजगार मिळाला आहे. एकूणच वाघांमुळेच येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.वनमंत्र्यांच्या नियोजनामुळे ताडोबाचे आकर्षण वाढलेराज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील काही वर्षांमध्ये ताडोबाच नाही तर, चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविला आहे. त्यांच्या दुरदृष्टीमुळे ताडोबामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकांचे निसर्गाबद्दल प्रेम वाढावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. यामुळे की काय, सर्वसामान्य नागरिकांचे निसर्गाबद्दल, जंगलाबद्दल, पर्यायाने ताडोबाबद्दलचे आकर्षण वाढत आहे.माया बनली ताडोबातील ‘सुपर स्टार’ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाची संख्या दुपटीने वाढली आहे. येथील वाघाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लिलांमुळे ताडोबाला सातासमुद्रापार नेऊन ठेवले आहे. अशाच या वाघाच्या ऐटदार वागण्याने वन्यजीव प्रेमी, पर्यटक व गाईड प्रत्येक वाघाला वेगवेगळ्या नावाने संबोधतात. आता मागील काही वर्षांपासून ‘माया’ या वाघिणीने आपल्या अनेक लिला पर्यटकांना दाखवून आपल्याकडे आकर्षित केले आहे. मायाच्या याच लिला आपल्या कॅमेºयात टिपण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मायाची एक झलक पाहण्यासाठी आतूर झाले असतात. त्यामुळे माया ही ताडोबातील ‘सुपरस्टार’ सेलेब्रिटी बनली आहे.ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामधील फक्त २० टक्के भाग पर्यटकांना खुला आहे. त्यामध्ये पर्यटकांना आजपर्यंत मोहर्ली परिसरात येडा अन्ना, वाघडोह, माधुरी, सोनम, काटेझरी मेल या वाघांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करून पर्यटकांना आकर्षित केले होते. आता नवेगाव, पंढरपोवनी परिसरातील जंगलात गब्बर, मटकासूर, मोवा खड्डा, कॅटरिना व माया या वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे.मुनगंटीवारांच्या पुढाकाराने माया वाघीण डाक तिकीटावरनवेगाव, पंढरपोवनी परिसरात सध्या ‘माया’ने आपल्या दोन बछड्यासह ताडोबातील पर्यटकांना चांगलीच मोहिनी घातली आहे. माया वाघिणीचे दोन पिलांसह सहज होणारे दर्शन, तसेच वेगवेगळ्या भावमुद्रा पर्यटकांना चांगलेच भावत आहे. त्यामुळे माया वाघिणीचे अमोल बैस यांनी घेतलेले फोटो वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फतीने अनेक सेलेब्रिटींना गिफ्ट देण्यात आले आहे तर माया वाघिणीचे चित्र सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने भारतीय डाक तिकीटवर सुध्दा प्रकाशित करण्यात येत आहे.
व्याघ्रदिन विशेष; काळ्या सोन्याचा जिल्हा झाला ‘टायगर लॅन्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 1:32 PM