भद्रावती (चंद्रपूर) : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर असलेल्या उर्जाग्राम ताडाळी येथील केंद्रीय कार्यशाळेत सोमवारी पहाटेच्या सुमारास वाघ शिरल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. लगेचच वनविभागाला कळविण्यात आले. सोबतच खबरदारी म्हणून सोमवारी सकाळी ८ वाजताच्या पाळीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्याआधीच सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे सुरक्षारक्षकांतर्फे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले.
उर्जाग्राम ताडाळी येथे वेकोलिची केंद्रीय कार्यशाळा आहे. याठिकाणी वेकोलीच्या बल्लारपूर, चंद्रपूर, वणी एरिया, वणी नॉर्थ, माजरी, उमरेड, नागपूर, पाथरखेडा याठिकाणी असलेल्या खाणींमध्ये कार्यरत असणाऱ्या जेसीबी, पोकलॅन, डोजर, डंपर व इतरही मशीनरीजच्या इंजिनच्या दुरूस्तीचे काम केले जाते. सोबतच वेल्डींग व इलेक्ट्रीकलचे कामदेखील केले जाते. त्यामुळे याठिकाणी कामगारांची नेहमीच वर्दळ असते. केंद्रीय कार्यशाळेत सकाळी ८ ते ५ व दुपारी ४ ते रात्री १२ या दोन पाळींमध्ये काम चालते. मात्र याच केंद्रीय कार्यशाळेत रविवारी रात्रीच्या सुमारास वाघ शिरल्याचे गस्तीवर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना लक्षात आले.
सोमवारी सकाळच्या पाळीतील कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली. सोबतच दुपारच्या कर्मचाऱ्यांनाही कामावर येण्यापासून मज्जाव करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली असून वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
परिसरातील नागरिकही दहशतीत
मागील काही महिन्यांपासून या परिसरात वाघाचा संचार सुरू आहे. याच परिसराला लागून अनेकांची शेती असल्याने दिवसा काम करणेही कठीण झाले. कर्मचारी कर्तव्यावर जाताना प्रचंड दहशतीत असतात. शेतीचे राखण करणे कठीण जात असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे, अशी माहिती परिरातील ग्रामस्थांनी दिली.
ताडोबातील वाघांचा मानवी वस्तीत संचार
ताडोबात वाघांची संख्या वाढली. त्यामुळे आपला नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्त्यांमध्ये शिरत आहेत. याबाबत वन विभागाला काही महिन्यांपूर्वीच माहिती देण्यात आली होती. मात्र, संबंधित पथकाने धावती पाहणी करून त्यानंतर दुर्लक्ष केले. तेव्हापासून या परिसरात वाघांचा संचार वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.