राजेश भाेजेकर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची गोष्टही या वर्षात घडली. सहा वर्षांपूर्वी एका वाघिणीने तब्बल चार मादी बछड्यांना जन्म दिला होता. हे सर्व बछडे आता मोठ्या वाघिणी झाल्या आहेत. यातील एका वाघिणीनेही चार मादी बछड्यांना जन्म दिला. ही वाघीण दुसरी तिसरी कोणी नसून ताडोबात आपल्या बछड्यांसह पर्यटकांना भुरळ घालणारी तारा वाघीण आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांची संख्या १८० असल्याची माहिती पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना तेथील गाईड देतात. ही संख्या वाढण्याचे मुख्य कारणही आता पुढे आले आहे. वाघीण मागील सहा वर्षांपूर्वी ताडोबात प्रसिद्ध असलेल्या तेलीया परिसरात वावरायची. या वाघिणीने त्यावेळी चार मादी बछड्यांना जन्म दिला होता. हे सर्व बछडे आता वाघीण म्हणून ताडोबात वावरत आहेत. त्यातील एका वाघिणीला आता लारा म्हणून ओळखले जाते. अलीकडे ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना ही वाघीण आपल्या चार बछड्यांसह दर्शन देत आहे.
आनंदाची बाब म्हणजे तिचे सर्व बछडे मादी आहेत. ही वंशवेल मागील सहा वर्षातील असल्याचे वनाधिकारी सांगत आहेत. त्यापूर्वीही असा प्रकार घडला असावा, हे नाकारता येत नाही, असे या वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब ताडोबातील वाघांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व्याघ्र संवर्धनाच्या अनुषंगाने ही बाबही महत्त्वाची मानली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या आनंददायी असली तरी २०२१ मध्ये जिल्ह्यात वाघाने तब्बल ४२ जणांचा बळी घेतला आहे. यामुळे वन्यजीव-मानव संघर्षही बघायला मिळाला. असे असले तरी चंद्रपूर जिल्हा आता खऱ्या अर्थाने वाघांचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे.
सहा वर्षांपूर्वी ताडोबाच्या तेलीया परिसरात एका वाघिणीने चार मादी बछड्यांना जन्म दिला होता. आता ते बछडे मोठे झाले आहेत. त्यातील एक लारा वाघीण आहे. सध्या लारा वाघीण आपल्या बछड्यांसह ताडोबात पर्यटकांना दिसत आहे. या वाघिणीसोबत असलेले चारही बछडे हे मादी आहेत. एका वाघिणीच्या वंशानेही चार मादी बछड्यांना जन्म दिल्याची ही दुसरी घटना आहे. ही बाब ताडोबातील वाघांची संख्या वाढण्याचे शुभसंकेत आहे.
- महेश खोरे, उपवनसंरक्षक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोअर), चंद्रपूर.