चंद्रपूर : एक पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करताना थेट विहिरीत पडला. ही वार्ता सर्वत्र पसरताच परिसरातील नागरिक त्या दिशेने धावत गेले. वनविभागही घटनास्थळी पोहोचला आणि तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर वाघाची विहिरीतून सुटका करण्यात यश आले. विहिरीबाहेर निघताच वाघाने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. हे थरारक दृश्य तेथे जमलेल्या नागरिकांना डोळ्यात साठविले. ही घटना वरोरा तालुक्यातील अल्फेर गावाच्या शिवारात सोमवारी सकाळी घडली.
वरोरा तालुक्यातील शेगाव उपवन क्षेत्रातील अल्फर गावाच्या सर्व्हे क्रमांक १०० मध्ये महादेव शिवा सरपाते यांच्या शेतात बांधकाम केलेली विहीर आहे. सकाळी सहा वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघ हरणाच्या कळपाचा पाठलाग करीत होता. कळप विहिरीच्या दिशेने धावत होता. मात्र, विहीर दिसताच, हरणाच्या कळपाने अचानक वळण घेतले. वाघाचे लक्ष कळपावर असल्यामुळे त्याला विहीर दिसली नाही. अशातच तो विहिरीत पडला.
ही थरारक घटना शेतकरी संजय सरपाते यांनी स्वत:च्या डोळ्याने बघितली. ही माहिती त्यांनी वनविभागाला दिली. घटनेची वार्ता पसरताच, वाघाला बघण्याकरिता हजारो लोकांनी शेताकडे धाव घेतली. अखेर शेगाव पोलिसांना पाचारण करण्यात आले.
वाघ पडलेल्या विहिरीत एक दोरखंड सोडण्यात आला. त्यानंतर, दोरीच्या साह्याने पलंग विहिरीत सोडण्यात आला. वाघ त्या पलंगावर उभा झाला आणि त्याने विहिरीतून थेट बाहेर उडी घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. तब्बल सहा तासांनंतर वाघ विहिरीच्या बाहेर निघाला. अंदाजे तीन वर्षांचा हा नर वाघ होता.
वाघाचा वावर सध्या याच परिसरात राहणार असल्याने शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. शेतात कापूस वेचणी, चणा व गव्हाची पेरणी सुरू आहे. वाघाच्या भीतीने मजूर मिळणे कठीण झाले आहे. वाघ बघण्याकरिता नागरिक झाडावर चढले होते. वाघ ज्या दिशेने गेला, त्या परिसरात वनविभागाने गस्त वाढविली आहे.