लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा जंगल परिसरातील लागूनच असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात वाघ-बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाल्याने नागरिकांना रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे कठीण झाले. २४ तासांत वाघाने दोघांचा बळी घेतला. या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली नाही, तर परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते, असा अंदाज आल्याने नागरिकांत आता प्रचंड असंतोष खदखदू लागला आहे.बुधवारी वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वाघ आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला होता. हा वाघ ताडोबा जंगलातून चंद्रपूर- नागपूर मार्गावरील राष्ट्रवादी नगर परिसरातील वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आला. काहीवेळ त्याच ठिकाणी भटकून तो पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. या परिसराला लागून मोठी वसाहत आहे. परिसरात आलेला वाघ घनदाट जंगलात न जाता त्याच परिसरात फिरत असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीजकेंद्रातील कंत्राटी कामगार भाेजराज मेश्राम हे कर्तव्यावरून घरी परत जात असताना वीजसंच क्रमांक १ जवळील रेल्वेरूळाजवळ वाघाने भोजराजवर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्री दुर्गापूर येथील १६ वर्षीय युवकावर वाघाने हल्ला चढवून ठार केले. त्यामुळे सीएसटीपीएस परिसरानजीक असलेल्या वसाहतींमध्ये प्रचंड दहशत पसरली. रात्रपाळीत कर्तव्य बजावणारे कामगारही हादरले आहेत.
वाघ-बिबटाचा मानवी वस्तीत शिरकाव- ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली असून नैसर्गिक अधिवास क्षेत्र कमी पडू लागले. त्यामुळे इरई नदीच्या काठाने वाघ-बिबट व हिंस्त्र वन्यप्राणी चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात शिरकाव करीत आहेत.
तर घराबाहेर निघणे कठीण- चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात घनदाट जंगल तयार झाले आहे. या परिसरात दिवसभर वर्दळ असली तरी रात्रीच्या सुमारास तिथे प्रवेश करणे आता कठीण झाले. जंगलाला लागून असलेल्या ऊर्जानगर, दुर्गापूर, राष्ट्रवादी नगर परिसरात रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांचा संचार नित्याचाच होता. मात्र, आता वाघ व बिबट फिरू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत. वाघ-बिबट्याचा बंदोबस्त केला नाही, तर घराबाहेर निघणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त करीत आहेत.