लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर: सिंदेवाहीचाच एक भाग असलेल्या लोनवाहीतील झुडपी जंगलाला लागून असलेल्या राईसमिलमध्ये सकाळी एक वाघ शिरल्याने चांगलीच खळबळ उडाली. या वाघाने तेथील चालकावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजता घडली. यानंचर हा वाघ परिसरातच लपून बसला आहे. त्याचा वनविभाग कसून शोध घेत आहे. शिवाय त्याला जेरबंद करण्यासाठी परिसराला ग्रीननेटचे कुंपणही घातले आहे.
वाघाने जखमी केलेल्या चालकाचे नाव गजानन ठाकरे (४५) असे आहे. गजाननवर जखमीवर ग्रामीण रूग्णालयात उपचार केल्यानंतर चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. वाघाने चालकाला जखमी केल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मात्र वाघ कुणाच्याही निदर्शनास आला नाही. वाघाचा शोध घेवून जेरबंद करण्यासाठी परिसर पिंजून काढत आहेत.वृत्तलिहेपर्यंत वाघ गवसला नाही. तो राईसमीलमध्येच लपून बसला असावा, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
सिंदेवाही शहराच्या हद्दीतील लोनवाही येथे सहकारी राईसमिल चालविले जाते. मिलच्या आजुबाजुला झुडपी जंगल आहे. या मिलमध्ये गजानन ठाकरे हे मागील काही वर्षांपासून चालक म्हणून काम करीत आहेत. सकाळी ९ वाजताच्या सुमारास नियमितपणे काम सुरू असताना वाघाने थेट राईसमिलमध्ये शिरून गजानन ठाकरे यांच्यावर हल्ला केला. मात्र, गजाननने जीवाची पर्वा न करता वाघाचा सामना केला.यानंतर वाघ झुडूपाच्या दिशेने पळाला. या हल्ल्यात गजाननच्या मानेवर खोलवर जखम झाली आहे. त्याने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. नागरिकांची एकच गर्दी झाली. वन विभागाचे अधिकारी व पोलिसांना माहिती दिलेल्यानंतर ताफा घटनास्थळावर दाखल झाला. आजूबाजूला झुडपी जंगल असल्याने हल्लेखोर वाघ दडून असल्याची शक्यता आहे. सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. गोंड , क्षेत्र सहाय्यक आर. एम. करंडे, पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके आदींच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांचा ताफा हल्लेखोर वाघाचा शोध घेत आहेत.झुडपी जंगलात लावली जाळीसहकारी राईसमिलमागे झुडपी जंगल आहे. या परिसरात गावठी डुकरांचा नेहमी संचार असतो. त्यामुळे हल्लेखोर वाघ याच झुडूपात लपून बसल्याची शक्यता असल्याने वन विभाग व पोलिसांनी परिसरात लोखंडी खांबाला ग्रीननेटची जाळी लावून सर्च मोहीम सुरू केली आहे. शिवाय, सिंदेवाही शहरात वाघाने शिरकाव करू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.दोन पिलांसह वाघिण असल्याची चर्चामागील काही वर्षांत झुडपी जंगल घनदाट झाले. त्यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांचा नेहमी संचार असतो. काही दिवसांपासून या झुडपी जंगलात दोन पिलांसह एक वाघिण फिरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.घटनास्थळावर तोबा गर्दीवाघाने सहकारी राईसमिलमधील चालकावर हल्ला केल्याची माहिती मिळताच लोनवाही- सिंदेवाही येथील नागरिकांनी तोबा गर्दी केली. हल्लेखोर वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभाग व पोलिसांचे पथक राईसमिल परिसरात ठिय्या मांडून आहेत. त्यामुळे नागरिकांचीही गर्दी वाढत आहे.गजानन ठाकरे यांच्या जखमांवरून वाघानेच हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय परिसरात वाघाचे पर्गमार्कही आढळले. वाघाचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या सुचनेनुसार शोध मोहीम सुरू आहे.- आर. एस. गोंड, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही.