चंद्रपूर: ताडोबाच्या बफर क्षेत्रातील बोर्डा (ता. चंद्रपूर) बीटमधील घंटा चौकीजवळ शिवा नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा मृतदेह सोमवार(दि. १५) रोजी दुुपारच्या सुमारास आढळला. घटनास्थळाच्या अवलोकनावरून दोन वाघांच्या झुंजीत शिवाचा बळी गेला असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. मृत वाघ शिवा हा १२ वर्षांचा होता. ताडोबाच्या कोलारा बीटच्या हद्दीत शिवा नावाच्या वाघाचा वावर होता. अनेकदा त्याने पर्यटकांना आपले दर्शन दिले असल्याची माहितीही वन विभागाने दिली.
८ जानेवारी रोजी वन विभागाचे पथक नेहमीप्रमाणे माॅनिटरिंग करताना शिवा हा वाघ जखमी अवस्थेत आढळला. तेव्हापासून वन विभागाच्या पथकाने शिवावर माॅनिटरिंग करून खाद्य पुरविणे सुरू केले होते. दरम्यान, सोमवारी त्याचा मृतदेहच आढळला. वन विभागाच्या पथकाला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घातली.
त्यानंतर वाघाचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. वाघांच्या झुंजीतच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शवविच्छेदनानंतर शिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती चंद्रपूर बफरचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.