राजेश बारसागडे
सावरगाव (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यातील नागरिकांच्या तोंडून अलीकडे वाघ दर्शनाच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. यात काही रंजक तर काही अत्यंत भीतिदायकही आहेत. बुधवारी तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या हस्तिनापूर गावालगत अशीच एक अंगावर भीतीचा काटा उभा करणारी घटना घडली, आणि पुन्हा एकदा हस्तिनापूरवासीय वाघाच्या दहशतीने भीतिग्रस्त झाले आहेत.
तालुक्यातील हस्तिनापूर येथील एलआयसी अभिकर्ता असलेले आनंद उरकुडा कुंभारे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी काम आटोपून सिंदेवाहीहून पळसगाव जाट - वाढोणा मार्गे अजय वासुदेव लाडे या मित्रासोबत दुचाकीने या मार्गावरच असलेल्या हस्तिनापूर येथे जात होते. दरम्यान, मानकादेवी मंदिर परिसरातील झुडपी जंगलातून अंधारात त्यांना वाघाचे डोळे चकाकताना दिसले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी दुचाकी सुरूच ठेवली. तेवढ्यात समोरून ट्रॅक्टर येत असल्याने आणि रस्ता अरुंद असल्याने आनंद कुंभारे यांनी गाडी थांबविली. सोबतच जीवनापूर येथील अनुकूल भास्कर खोब्रागडे यांनीसुद्धा पळसगाव येथील स्वतःची मोबाइल शॉपी दुकान बंद करून आले असता तिथे गाडी थांबविली. तेवढ्यात पट्टेदार वाघाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या पल्ल्यावर उडी मारली आणि दोन्ही पंजांनी पल्ल्याला लोंबकळत पकडले. मात्र ट्रॉलीतील लोकांनी आरडाओरड सुरू केल्याने तो खाली उतरला आणि थेट त्यांच्या गाडीसमोरच आला. वाघ आणि त्यांच्यात केवळ पाच फुटाचेच अंतर होते. मात्र, वाघ काही करण्याच्या अगोदरच कुंभारे यांनी गाडी सुरू केली आणि गाडीचा एक्सीलेटर वाढवून जोराचा आवाज केला. तर तिकडे ट्रॅक्टरचा आवाज यामुळे वाघ गोंधळला आणि जंगलात पळून गेला. ते दोघे वाघाच्या तावडीतून बालंबाल बचावले. हा सारा घटनाक्रम गुरुवारी आनंद कुंभारे व त्यांच्या मित्रानी ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.
या परिसरातील तिसरी घटना
या अगोदरसुद्धा हस्तिनापुरातील आनंद कुंभारे यांच्या तरुण पुतण्याचा घराजवळच्या शेतात काम करीत असताना वाघाने पाठलाग केला होता. मात्र, प्रसंगावधान साधून मुलाने तिथून पळ काढीत थेट घराकडे धाव घेऊन जीव वाचविला होता. तर दुसऱ्या घटनेत वाढोणा येथील मेडिकलचे मालक पवन बोरकर व पुंडलिक बोरकर हे याच मार्गावरून गावाकडे येत असताना मानकादेवी मंदिर परिसरातच त्यांच्या दुचाकीच्या मागे शंभर फूट अंतरापर्यंत पट्टेदार वाघाने पाठलाग केला होता. आता ही तिसरी घटना आहे. दरम्यान, या तिन्ही घटनेतील हा एकच वाघ असावा असा नागरिकांचा कयास आहे.
सिंदेवाही-पळसगाव जाट ते वाढोणा या मार्गाचे रुंदीकरणाचे काम झाल्यातच आहे. मात्र, मानकादेवी परिसरानजीकच्या रस्त्याचा काही भाग वादात असल्याने येथे रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे येथे रस्ता अरुंद आहे व झुडपी जंगलाने व्यापलेला आहे. याबाबत वन विभागाशी संपर्क करून झुडुपांची कटाई करण्याची विनंती केली आहे. माझ्याबाबत घडलेली घटना इतरांसोबत घडू नये.
- आनंद उरकुडा कुंभारे, हस्तिनापूर