चिमूर (चंद्रपूर) : खडसंगी वनपरिक्षेत्र (बफर) अंतर्गत येणाऱ्या बाह्मणगाव येथील शेतकरी शेताशेजारी असलेल्या जंगलालगत बैल चारत असताना अचानक वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना बाह्मणगाव शिवारात मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली. चिमूर तालुक्यात एकाच आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात गेलेला हा चौथा बळी असून, शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
ऋषी किसन देवतळे (६०, रा. बाह्मणगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर क्षेत्रालगत असलेल्या बाह्मणगाव येथील शेतकरी ऋषी देवतळे हे पत्नी, मुलगा यांच्यासह सकाळी शेतात शेतीचे काम करण्यासाठी गेले होते. दुपारपर्यंत काम संपल्यावर आपले बैल शेताशेजारी लागून असलेल्या शिवारात चारत होते. दरम्यान, शेजारच्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने ऋषी देवतळे यांच्यावर हल्ला चढवला. त्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील व शिवारातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती होताच खडसंगी बफर झोनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.
वाघाने असे घेतले जीव...
- ११ जुलै २०२३- तळोधी वनक्षेत्रात बोडधा बीट येथे ईश्वर गोविंदा कुंभारे.
- १२ जुलै- तळोधी वनक्षेत्रात उश्राळमेंढा येथील गुरुदास चनफने.
- १४ जुलै- चिमूर वनपरिक्षेत्रात डोमा बीट येथे डोमणू सोनवाने.
- १८ जुलै- खडसंगी बफर क्षेत्रात ऋषी किसन देवतळे.