चंद्रपूर : वाघाच्या दहशतीने शेतकऱ्यांनी अद्याप शेतात पऱ्हे टाकले नाही. गुरुवारी पद्मापूर येथे गावालगत शौचास गेलेल्या इसमावर वाघाने अचानक हल्ला चढवून त्याला सुमारे एक कि.मी. अंतरापर्यंत फरफटत नेले आणि ठार केले. हा वाघ आता थेट गावात व शेतात जावून हल्ला चढवत आहे. तो जंगलात शिकारी करीत नाही. त्याच्या तोंडाला मनुष्याचे रक्त लागल्याने तो नरभक्षी झाला आहे. या वाघाची शेतकरी, गावकऱ्यांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. ही दशहत संपुष्टात आणण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांसह आ. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथील विश्राम गृह येथून मुख्य वन संरक्षक कार्यालयावर वाघ मारा वाघ मारा...अशा गगनभेदी घोषणा देत मोर्चा काढला. मोर्चा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पोहचताच ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन गाऊ लागले. आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्य वनसरंक्षक शेळके यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र यात यश आले नाही. अखेर त्यांनी नॅशनल टायगर कन्झर्वेेशन अॅथॉरिटीच्या सदस्यांना कार्यालयात बोलावून सदर नरभक्षक वाघाला ठार मारण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव यांना पाठविला. यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या वाघाला ठार मारण्याच्या आदेशाची वाट पहात आंदोलक रात्री उशिरापर्यंत तिथेच ठिय्या मांडून होते. या आंदोलनात आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अश्वीनी खोब्रागडे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, काँग्रेसचे चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख महेश मेंढे, बल्लारपूचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नंदा नल्लूरवार, अमजद अली, शिवाराव याच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘त्या’ वाघामुळे शेतीची कामे झाली होती प्रभावित
By admin | Published: June 24, 2017 12:39 AM