लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा दुर्गापूर, ऊर्जानगर नेरी व कोंडी परिसरात मागील काही महिन्यांत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेला, तर काही जखमी झाले. दुर्गापुरातील वाॅर्ड क्रमांक १ व २ मधील मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार सुरू असल्याने धोका टाळण्यासाठी चंद्रपूर वनपरिक्षेत्राच्या वतीने सुमारे एक किमीपेक्षा अधिक अंतरावर १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराला लागून असलेल्या नेरी, कोंडी व दुर्गापूर येथील वाॅर्ड क्रमांक १, २ व ३ या भागात वन्य प्राण्यांचा संचार सुरू असतो. वाघ व बिबट्याचा संचार तर नित्याचा झाला आहे. हिंस्र वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरू लागल्याने संघर्ष वाढला. वाघ व बिबट्याच्या हल्ल्याने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली. हा परिसर दुर्गापूर ग्रामपंचायत व वेकोलीच्या हद्दीत येतो. चंद्रपूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. परंतु, झुडपी जंगलामुळे वाघ व बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षांच्या मुलाचा बळी गेल्याने संतप्त नागरिकांनी वेकोली व्यवस्थापकाच्या कार्यालयाची तोडफोडही केली होती. त्यानंतर वेकोलीने परिसरातील काटेरी झुडपे तोडून स्वच्छता केली. आता चंद्रपूर वन विभागाने प्रभावी पाऊल उचलले. दरम्यान, वनविभागाने सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक कामाची पाहणी करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, रायुकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते सचिन मांदाळे, राहुल भगत, सौरभ घोरपडे, भोजराज शर्मा उपस्थित होते.
नागरिकांची जबाबदारी चंद्रपूर वन विभागातर्फे १.२५ किलोमीटर लांबीच्या या परिसराला सोलर लाईटसह १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू झाले. या जाळीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याचा मार्ग बंद होणार आहे. परिसरातील सर्वसामान्य नागरिक आता सुरक्षित होतील. सव्वा किलोमीटरवरील जाळीमुळे काही कच्चे पायवाट असलेले रस्ते बंद होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेसाठी लावलेली ही जाळी नागरिकांनी न तोडता वन विभागाला सहकार्य केले पाहिजे.
..तरीही काळजी घ्यावी लागेल - वेकोली हद्दीतील झुडपी जंगलामुळे वन्यप्राण्यांना या परिसरात आडोसा मिळतो. - सध्या या परिसराची स्वच्छता करण्यात आली. परंतु, पावसाळ्यात झुडपे पुन्हा वाढणार आहेत. त्यामुळे वेकोली, ग्रामपंचायत व वन विभागाला याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
वन विभागातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ब्रेडेड जाळी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. ही जाळी १५ फूट उंचीची आहे. जाळीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करणार नाही. शिवाय नागरिकांचे दैनंदिन जीवनही सुरक्षित राहील.-राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर
वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. अनेक आंदोलनही केले. त्यामुळे वन विभागाने वस्तीभोवती जाळी लावण्याचा फार महत्त्वाचा निर्णय घेतला. -नितीन भटारकर, जिल्हाध्यक्ष रायुकाँ