राजेश बारसागडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील वाढोणा, आलेवाही, ऊश्राळ मेंढा, खरकाडा, आकापूर आदी गावांत नरभक्षक वाघाचा हैदोस सुरू असून, दोन गुरख्यांना ठार करून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, जनावरांना वाघाने फस्त केले आहे. सद्यस्थितीत वाढोणा परिसरातील अनेक गावांत शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत तोंडाला मनुष्याच्या व जनावरांच्या रक्ताचा वास लागलेला नरभक्षक वाघ शेतकऱ्यांच्या रोवणी हंगामात अडसर ठरत आहे. भीतिपोटी अनेक शेतकरी त्यांच्याच शेताकडे फिरकायलाही तयार नाहीत. दरम्यान, या नरभक्षक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील अनेक गावांतील शेतकरी तथा नागरिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.आलेवाही बिट कक्ष क्र.७०३ मध्ये येत असलेल्या खरकाडा जंगल परिसरात मंगळवारी रमेश वाघाडे या गुराख्यास वाघाने ठार केले. त्या अगोदर जवळील आकापूर येथील गुराख्यास रात्रीच्या सुमारास वाघाने मारल्याची घटना घडली होती. .या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या व कित्येक जनावरांना या वाघाने ठार केले आहे. दोन्ही गुराख्यांना व विविध जनावरांना यमसदनी पाठविणारा नरभक्षक हा एकच पट्टेदार वाघ आहे, असे संबंधित गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. वाढोणा-ऊश्राळ मेंढा या गावांच्या मधोमध शेतशिवारांना लागून गोसेखुर्द कालवा गेलेला आहे. कालव्याच्या पाळीवर मोठमोठी झाडे तयार झाल्याने व झुडपी जंगल असल्याने, या परिसरात वाघाची वसाहत आहे, शिवाय रंगी तलावाच्या सभोवताल किरकोळ झुडपी जंगलाचा वेढा आहे आणि या वेढ्यासभोवताल वाढोणा, ऊश्राळ मेंढा, सावरगाव खरकाडा, जीवनापूर आदी गावांतील नागरिकांचे शेत आहेत. रमेश वाघाडेला ज्या परिसरात वाघाने मारले, त्याच परिसरात अर्जुन सोनवाणे रा.खरकाडा, सदाशिव मडावी रा.जीवनापूर, गुलाब कुळमेथे रा. जीवनापूर, मार्कंडी कोमावर रा.वाढोणा, राजू कुळमेथे, उत्तम मेश्राम, रवि सहारे, रामदास निकुरे, सुभाष गजबे यांच्यासह आलेवाही, आकापूर, वाढोणा, खरकाडा, ऊश्राळ मेंढा, जीवनापूर आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांची शेती आहेत, शिवाय रंगी तलाव शेजारीही ऊश्राळमेंढा व वाढोणा या गावांतील अनेक शेतकऱ्यांचे शेत आहे आणि सभोवताल जंगलाचा वेढा आहे. सद्यस्थितीत शेतीतील रोवणीचा हंगाम जोरात सुरू आहे आणि परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. हा वाघ केव्हाही जंगल परिसरातून शेतात प्रवेश करू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी स्वतःच्या शेतात जायला घाबरत आहेत.
...आणि वाघ तिच्या मागे धावत आला
एकाच महिन्यात वाढोणा परिसरात दोन गावांतील दोन गुराख्यांना वाघाने ठार मारले. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरकाडा जंगल परिसरात आहेत. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी घाबरलो आहोत. शेतात जाणे म्हणजे युद्धात गेल्यासारखे वाटू लागले आहे. या वाघाचा तात्काळ बंदोबस्त हवा आहे. मात्र वनविभागाने अजूनही कुठलीही उपाययोजना केली नाही.-अर्जुन गोपाला सोनवानेशेतकरी,खरकाडा.
नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतालगतच्या परिसरात वाघाने मागील १५ दिवसांत बराच धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांत भीतीचे सावट पसरले आहे. परिणामी, शेतीची कामे खोळंबली आहेत. वाघाचा कायम बंदोबस्त करण्याबाबत खासदार अशोक नेते यांना कळविले आहे. - होमदेव मेश्राम, माजी तालुकाध्यक्ष, भाजपा, नागभीड.