वाघाचा परिसरात वावर : आतापर्यंत १५ जनावरे व एका महिलेचा मृत्यूसावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गंगासागर हेटी या जंगल व्याप्त परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे १५ ते २० जनावरे पट्टेदार वाघाने ठार केले असून एका महिलेलासुद्धा वाघाने ठार केले आहे. दरम्यान सदर वाघ त्याच परिसरात असल्याने वाघाची दहशत अजूनही कायम आहे.गंगासागर हेटी येथील प्रेमीला बोरकर या महिलेला तेंदूपत्ता संकलन करीत असताना पट्टेदार वाघाने ठार केले. ही घटना मागील महिन्यात घडली होती. यासोबतच परिसरातील उश्राळ मेंढा, वाढोणा आवळगाव, सोनापूरे, तुकूम, जीवनापूर, सावरगाव आदी गावातील अनेक शेळ्या वाघाने फस्त केल्या तर गंगासागर हेटी व उश्राळमेंढा येथील अनेक शेतकऱ्यांचे १५ ते २० जनावरे याच वाघाने ठार केली आहेत. त्यामुळे गंगासार हेटी परिसरात अजूनही वाघाची भीती कायम आहे.उश्राळ मेंढा व गंगासार हेटी या दोन्ही गावासभोवताल जंगल श्रेत्र आहे. दोन्ही गावाच्या मधोमध रांजीचे जंगल आहे. येथेच जनावरे चरायला जातात. या ठिकाणीच कित्येक वेळा वाघाने जनावरांवर हल्ले केलेले आहे. या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत. जंगलाला लागूनच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने शेतात जागल करताना भीतीचे सावट पसरले आहे. शिवाय सायंकाळी घराबाहेर पडणेसुद्धा नागरिकांना कठीण झाले आहे. या परिसरात एक नव्हे तर अनेक वाघ असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असला तरी वाघाचा बंदोबस्त मात्र केला नाही. त्यामुळे नागरिकांची भीती कायम आहे. (वार्ताहर)
गंगासागर हेटी परिसरात वाघाची दहशत
By admin | Published: April 12, 2017 12:58 AM