घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील म्हसली पाहार्णी जंगल परिसरातील अनेक गावात वन्यप्राण्यांची चांगलीच धूम सुरू आहे. तालुक्यातील तेलीमेंढा - म्हसली मार्गावर तर वाघाचे दिवसा ढवळ्या वाघाचे दर्शन होत आहे. यास दुजोरा देणारा एक व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहार्णी म्हसली परिसरातील रस्त्याने प्रवास करताना मनात चांगलीच धाकधूक असते.म्हसली तेलीमेंढा परिसर जंगलव्याप्त आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात जंगलाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पाहार्णी ढोरपापर्यंत या जंगलाचा व्याप असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्य या जंगल परिसराला जवळ आहे. हा अभयारण्यास प्रसिद्धीच्या झोतात आणणाऱ्या सुप्रसिद्ध ''जय'' या वाघाची नेहमीच पाहार्णी म्हसली जंगलात भ्रमंती असायची. म्हणूनच जय बेपत्ता झाला. तेव्हा याच जंगलात अनेकदा जयचे ''लोकेशन'' घेण्यात येत होते. एवढेच नाही तर जय या वाघाचा बछडा म्हणून ज्याला ओळखले जायचे त्या ''श्रीनिवासन''ची हत्या याच म्हसलीनजिकच्या विलमजवळ करण्यात आली होती.अशी पार्श्वभूमी असलेल्या म्हसली, तेलीमेंढा, पाहार्णी या जंगल परिसरात वाघ, बिबट व अन्य जंगली प्राण्यांचा अधिवास सध्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या वन्यप्राण्यांनी व्यक्तींवर थेट हल्ला केल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या नसल्या तरी या वन्य प्राण्यांनी व्यक्तींना जंगलात व शेतात दिवसाढवळ्या दर्शन दिल्याच्या आणि पशुधनास जखमी व ठार केल्याच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. वनविभागाने या घटना लक्षात घेता या परिसरात गस्त वाढविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
व्हिडिओ व्हायरलयाच पार्श्वभूमीवर म्हसली तेलीमेंढा जंगल परिसरातील रस्त्याने एक वाघ स्वछंद विहार करीत असल्याचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. अगदी सकाळी दुधाची वाहतूक करणारी गाडी या रस्त्याने मार्गक्रमण करीत असताना हा वाघ जंगलातील रस्त्याच्या कडेकडेने येत असून काही वेळाने तो थेट रस्त्यावरच येतो. समोर वाघ आणि मागे दूध वाहतूक करणारी गाडी असे चित्तथरारक दृश्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
म्हसली पाहार्णी जंगल परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या परिसरातील रस्त्याने प्रवास करणे एकट्यादुकट्या माणसाचे काम नाही. अनेकदा शेतात काम करताना वाघ व बिबट्याचे दर्शन होत असते. वनविभागाने गस्त वाढवून गावकऱ्यांना दिलासा द्यावा.- जगदीश पानसे, गावकरी, म्हसली.