चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन विभागातील उत्तर वनपरिक्षेत्रातील मेणकी येथे शेतशिवारीतीव विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वी ही वाघिण विहिरीत पडली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
मेणकी येथील रामजी ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत ही वाघिण मृतावस्थेत आढळून आली. हे ठिकाण जंगलाला लागून आहे. तेथून विद्युत लाईन गेली असल्यामुळे दर चार-पाच दिवसांनी वन विभागाचे गस्तीपथक ती विद्युत लाईन तपासात असतात. मंगळवारी विद्युत लाईन तपासात असताना ठाकरे यांच्या शेताजवळ दुर्गंधी येत होती. पथकातील वन कर्मचाऱ्यांनी चौकशी केला असता विहिरीत वाघिण मृतावस्थेत दिसून आली.
मृत वाघिण जवळपास साडेतीन वर्षांची आहे. वाघिणीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उपवनसंरक्षक मल्होत्रा यांच्या उपस्थित पंचनामा करण्यात आला. वाघाचे सर्व अवयव शाबूत आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पराते, डॉ. लोडे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, वन्यजीव प्रतिनिधी बंडू धोत्रे, विवेक करंबेकर यशवंत कायरकर उपस्थित होते. यांच्या समक्ष वाघिणीवर अग्निसंस्कार करण्यात आले.