चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (कोंढा) शिव रस्त्यालगत एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या वाघिणीचामृत्यू शेतात लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
मृत वाघिणीचे वय अंदाजे चार वर्ष आहे. शरीर थोडेफार कुजले असले तरी तिचे अवयव सर्व शाबूत आहेत. तिचा मृत्यू दोन ते तीन दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. शेतातील जिवंत तारांच्या स्पर्शाने तिचा मृत्यू झाला असावा, यानंतर तिचा मृतदेह शिव रस्त्यालगत टाकण्यात आला असावा, असा संशय वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे यांनी व्यक्त केला आहे. वाघिणीचे शवविच्छेदन ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केले. घटनास्थळी विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनरक्षक निकिता चोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे, इको प्रोचे बंडू धोत्रे उपस्थित होते.
वनविभागाकडून शोध
वाघिणीचा मृत्यू विद्युत स्पर्शाने झाल्याचे घटनास्थळावरून दिसून येते. या अनुषंगाने वनविभाग तपास करीत आहे. दोन दिवसापूर्वी मांगली शेतशिवारात शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाने चितळाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती.