चंद्रपूर : शहरातील सिस्टर कॉलनी, नगिनाबाग, हरिओमनगर परिसरातील काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांच्या घरामधील नळातील पाणी प्रवाह कमी होतो. अनेकांना पुरेसे पाणीही मिळत नाही. त्यामुळे अशा नळधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कृषिपंप विजेच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही. अनेक शेतकरी जाेडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
जननी योजनेचा लाभ द्या
चंद्रपूर : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्यावतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
चंद्रपूर : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. ग्रामीण भागात सौरदिवे बसविण्याची योजना अपयशी ठरल्याने सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्या, अशी मागणी होत आहे.
अनेक गावांत लाईनमनच नाही
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांत राईसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु, अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे. त्यामुळे वेळीच वीज दुरुस्तीची कामे हाेत नाही. त्यामुळे प्रत्येक गावात लाईनमनची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.
जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे दुर्लक्षित
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. सावली तालुक्यात आसोला मेंढा, रिंगदेव तलाव, नागभीड तालुक्यात सात बहिणी डोंगर, मूल तालुक्यात सोमनाथ, गायमुख, कोरपना, राजुरा व जिवती तालुक्यात अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. याकडे पर्यटन विभागाने लक्ष देऊन पर्यटनस्थळाचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
मध संकलकांना प्रशिक्षण द्या
चंद्रपूर : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी बेराेजगार युवकांकडून केली जात आहे. या मागणीकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
स्टंटबाजीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
चंद्रपूर : अलिकडे युवा अवस्थेतील तरुणांमध्ये भरधाव वाहन चालवणे व स्टंटबाजीची जीवघेणे क्रेझ निर्माण झाली आहे. रात्री आणि दिवसादेखील हा प्रकार जोरात चालला असल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याकडे पोलीस प्रशासनाले लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
ओपन स्पेस बनले कचऱ्याचे केंद्र
चंद्रपूर : प्रत्येक वार्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
बालकांमध्ये वाढतेय चायनीजचे आकर्षण
चंद्रपूर : शहरातील गांधी चौक, गिरनार चौक, जनता कॉलेज चौकातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी चायनीजचे हातठेले सुरू करण्यात आले आहेत. शाळकरी विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक, युवती चायनीज पदार्थ खात असल्याचे दिसून येते. यामुळे बालकांच्या आरोग्यावर परिणामही होत आहे.