घुग्घुस : गावातील कचरा गोळा करून लोकवसाहतीच्या नजीक व रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे टाकीत आहेत. मात्र, कचऱ्याचे व्यवस्थापन करीत नसल्याने जिकडेतिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वेळोवेळी विविध पक्ष, सामाजिक संस्थांनी कचरा यार्ड गावाबाहेर न्यावे, अशी मागणी केली. मात्र या मागणीची नगर परिषदेने दखल घेतली नाही. अखेर तो कचरा साफसफाई करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
घुग्घुस एसीसी मार्गावर नियोजित क्रीडांगणाच्या खुल्या जागेवर लोकवसाहतीला लागून असलेल्या ठिकाणी व कोळसा कामगार वसाहतीनजीक जागेवर कचरा फेकण्यात येत आहे. पावसामुळे कचरा ओला होऊन कुजत आहे. त्यापासून घाण पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. गावातील कचरा गावाबाहेर फेकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.