सिंदेवाही : यावर्षी धान पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचे आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. शेतीसाठी लावलेला पैसा निघत नसल्याने ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय“ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
यावर्षी पाऊस पाणी चांगला असल्याने धान पीक जोमात आले होते. मात्र धान पिकावर रोगांचे आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांना उत्पादनापेक्षा ही लागलेला खर्च जास्त आलेला आहे. त्यामुळे आलेल्या उत्पादनात कसे उदरनिर्वाह करायचा या चिंतेमध्ये शेतकरी सापडला आहे. या ना त्या कारणाने शेतकरी संकटात सापडत असून मायबाप सरकार कोणत्याच प्रकारची मदत करीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी नाराजी निर्माण आहे. एका एकरामध्ये चार ते पाच पोती धान होत आहे. काहींना दहा-बारा पोती धान झाले. मजुरीमध्ये वाढ झाली. शेतीला लागणारा खर्च जास्त येत आहे. सरासरी ४ हजार रुपये धानाला भाव मिळणे अपेक्षित होते. पण अडीच हजार भाव देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. तालुक्यात धान्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असतानासुद्धा अनेक शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची रक्कमसुद्धा मिळत नसल्याने विमा कंपनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.