वेदांत मेहरकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : कोरोना या माहामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे परराज्यात रोजगाराच्या शोधात गेलेले लाखो मजूर अडकून बसले आहेत. अशातच अडकलेल्या मजुरांना तेथील प्रशासन अन्नधान्य व इतर जीवनावश्यक साहित्य पुरवठा करीत नसल्याने तसेच हाती कामही नसल्याने उदभवलेल्या उपासमारीच्या संकटाला तोंड देत अखेर मजुरांनी पायदळ चालून शेकडो किलोमीटरच्या प्रवासातून स्वगृही परतण्याची वाट धरली आहे. सर्वत्र नाकाबंदी असल्याने वाहने त्यांना मिळत नाही. एकूणच टाळेबंदीचा हा काळ गरीब मजूरवर्गासाठी नरक यातनेचा काळ ठरत आहे.कोरोनाच्या महामारी संकटाने संपूर्ण विश्वाला हैराण करून सोडत जवळपास सर्व देशांवर टाळेबंदीची पाळी आणली. अशातच भारतात घोषित केलेल्या टाळी बंदीचा सर्वाधिक फटका हा मजूरवर्गाला बसल्याचे दिसून येते. आपल्या राज्यात हाताला काम मिळत नसल्याने अनेक मजूर रोजगारासाठी विविध राज्यात जाऊन मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करतात. यंदाचे महाराष्ट्र राज्यातील बहुतांश मजूर हे मिरची तोडण्यासाठी लगतच्या तेलंगणा राज्यात गेले. मिरची तोडीचा हंगाम पूर्ण होण्याअगोदरच कोरोना संकटामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनमध्ये ते मजूर अडकलेत. अशा आपत्तीजनक परिस्थितीत हाताला काम नाही, जवळ दमडी नाही. तेथील प्रशासनाकडून मिळणारी तोकडी मदत यावर जीवन जगायचे कसे, असा दुहेरी पेचात टाकणारा सवाल अडकलेल्या मजुरांसमोर उभा ठाकला आहे. अशातच तब्बल महिनाभरा चा कालावधी लोटून गेल्यानंतरही ही टाळेबंदी वाढतच असल्याने हताश होऊन बसण्यापलिकडे पर्याय न उरलेल्या मजुरांनी अखेर स्वगृही परतण्यासाठी पायदळी प्रवासाची सुरुवात केली. पोटात अन्न नाही, जवळ पैसे नाही, अशाही बिकट परिस्थितीमध्ये मजुरांनी स्वगृही परतण्याचा चालविलेला लढा आजही कायम ठेवल्याचे मजुरांच्या मार्गक्रमणातून दिसून येते. मजुरांच्या या धाडसी पायदळी प्रवासादरम्यान माणुसकीच्या नात्याने अनेक मदतीरुपी हात सरसावत पुढे आल्याने माणुसकीचे दर्शन घडत आहे.डोक्यावर ओझे, कडेवर मुलेडोक्यावर ओझाचे गाठोडे, कडेवर लहान मुले, हातात स्वयंपाकाचे साहित्य तर दुसरीकडे आग ओकणारा सूर्य अशाही कठीण परिस्थितीत जीवाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचे अंतर गाठण्याचे ध्येय जराही डगमगलेले दिसत नाही. एकीकडे शासन धनाढय लोकांच्या मुलांकरिता शासन स्तरावरून तातडीने निर्णय घेत चक्क शेकडो किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष गाड्या सोडून मदतीचा हात देत आहे. तर दुसरीकडे मात्र लाखोंच्या संख्येने परराज्यात अडकलेल्या मजुरांप्रती उदासीनता दिसत आहे.राज्यात काम नसल्यानेच परराज्यात स्थलांतरस्वराज्यात काम मिळत नसल्याने परराज्यात लाखोंच्या संख्येने मजुरांचे जाणे हे राज्यासाठी नामुष्कीचे कारण असून कमीतकमी अशा आपत्ती काळात तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना योग्य न्याय मिळेल काय, असा प्रश्न पायदळ प्रवासातून स्वगृही परतण्याच्या वाटेवर असलेल्या मजुरांनी केला आहे.
टाळेबंदीचा काळ ठरला गरिबांसाठी नरक यातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 5:00 AM
कोरोनाच्या महामारी संकटाने संपूर्ण विश्वाला हैराण करून सोडत जवळपास सर्व देशांवर टाळेबंदीची पाळी आणली. अशातच भारतात घोषित केलेल्या टाळी बंदीचा सर्वाधिक फटका हा मजूरवर्गाला बसल्याचे दिसून येते. आपल्या राज्यात हाताला काम मिळत नसल्याने अनेक मजूर रोजगारासाठी विविध राज्यात जाऊन मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करतात.
ठळक मुद्देनशिबी पायी प्रवास : उपाशी पोट आणि शेकडो किमीची पायपीट