मृृत्यूचा क्रूर खेळ : किटाळी व खरकाडावासीयांसाठी ठरली शनिवारची काळी सकाळघनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : हातावर आणून पानावर आणे, हे त्यांचं रहाटगाडगं या रहाट गाडग्याची परिक्रमा पुर्ण करण्यासाठी ते नेहमीप्रमाणे जंगलात गेले. जंगलात जातांना आपल्यावर काळ असा काही घाला घालेल, अशी पुसटशी कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नाही. पण त्याच क्रूर काळाने त्यांचेशी असा काही खेळ खेळला की, प्रत्यक्ष त्या नियंत्यालाही अचंबित व्हावे लागले असेल.शनिवारी ती सकाळी सात-आठची वेळ असेल. नेहमीप्रमाणे ते अगदी हसतमुखाने घराबाहेर पडले. तसे ते रोजच बाहेर पडत होते. हातावर आणून पानावर खाण्यासाठी नियोजित ठिकाणी ते पोचलेही आणि नित्याप्रमाणे ते आपल्या कामाला लागले. अगदी मन लावून ते काम करीत होते. उद्याची स्वप्ने रंगवित. कोणाला त्यांच्या मुलामुलीसाठी सुंदर ड्रेस खरेदी करावयाचा होता. कोणाला मुलीसाठी छान फ्रॉक घ्यायचा होता. पावसाळ्याच्या बेगमीसाठी कोणाला गहू-तांदूळ खरेदी करायचे होते. त्यांच्या मनात हे सारे स्वप्न होते.ते उद्याची स्वप्ने रंगवित असतांनाच काळ मात्र त्यांचेवर हसत होता आणि एका अस्वलाच्या रूपाने तो त्यांच्या अगदी नजिक येवून ठेपला होता. ते मात्र उद्याच्या स्वप्नातच रममान झाले होते. त्यांच्या स्वप्नांचा आणि काळाचा असा पाणशिवणीचा खेळ सुरू असतानाच काळाने अखेर झडप घातलीच आणि त्यांच्या स्वप्नांची अक्षरशा राखरांगोळी केली. किटाळी व खरकाडा येथील तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांवर अस्वलाच्या रूपाने जो काळाने घाला घालून ४ मजुरांचा बळी घेतला. त्यांची ही चित्तर कहाणी.काळाने घातलेल्या या घाल्यात रंजना अंबादास राऊत, मिना दुधराम राऊत, बिसन सोमा कुळमेथे व फारूक युसुफ शेख यांचा जो बळी घेतला तो खरोखरच हृदयद्रावक आहे. या घटनेने आता सारीच पंचक्रोशी धास्तावली आहे. या घटनेत मृत पावलेल्या मजुरांप्रमाणेच त्यांचेही स्वप्ने आहेत. पण त्यांच्या मनात आता जी चरक निर्माण झाली आहे ती चरक त्यांना त्यांची स्वप्ने पुर्ण करू देईल काय? याबाबत शंकाच आहे. आता या मृतकांना शासकीय शिरस्त्याप्रमाणे मदत देवून त्यांचे सांत्वन करण्यात येईलही. पण यात कोणाचा बाप गेला, कोणाची आई गेली, कोणाचा भाऊ गेला, याचे काय?
‘त्यांच्या’वर प्रत्यक्ष नियंत्यालाही लाजविणारी वेळ
By admin | Published: May 14, 2017 12:35 AM