मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : पालकमंत्र्यांनी घेतला आयोजनाचा आढावाचंद्रपूर : माजी मुख्यमंत्री मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या स्मारकाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मूल येथे ४ एप्रिल रोजी करण्यात येत आहे. तसेच स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे उद्घाटनही करण्यात येत आहे. त्यनिमित्त होणाऱ्या जाहीर सभेसाठी मूल नगरी सज्ज झाली आहे. पक्षाभिनिवेश सोडून कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या राज्याचे वित्त,नियोजन व वने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कर्तृत्वावर मंगळवारी शिक्कामोर्तब होणार आहे. मारोतराव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांनी २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ रोजीपर्यंत राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते. चंद्रपूरच्या या सुपुत्राचे अद्ययावत स्मारक उभे राहावे, यासाठी पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी आमदार असताना राज्याच्या विधिमंडळात सातत्याने पाठपुरावा केला. कन्नमवार काँग्रेसचे असतानाही त्यांच्या या स्मारकासाठी त्यांनी हक्कभंगासारखे आयुध वापरुन निधी मंजूर केला. विधिमंडळात ना. मुनगंटीवार यांनी लावून धरला होता. त्यावेळी तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकाच्या भूमिपूजनाला येण्याची इच्छा दर्शविली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच या स्मारकाचे ४ एप्रिल रोजी लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)अद्ययावत स्मारकात सांस्कृतिक सभागृहया स्मारकामध्ये तयार करण्यात आलेले सांस्कृतिक सभागृह हे लवकरच विदभार्तील दर्जेदार नाट्यगृह म्हणून ओळखले जाणार आहे. ६०० आसन क्षमतेचे हे नाट्यगृह पूर्णपणे वातानुकुलीत असून ‘जेबीएल’ या साऊंड सिस्टीमने परिपूर्ण आहे. नाटय व सांस्कृतिक प्रयोगासाठी आवश्यक असणारे ‘मॅपललोड स्टेज’, प्रतिध्वनी न उमटणारे छत, दोन्ही बाजूला आधुनिक सुविधांनी युक्त ग्रीनरुम व अन्य आधुनिक तंत्रज्ञानांनी परिपूर्ण आहे. याच प्रेक्षागृहाच्या मागच्या बाजूला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची वास्तू उभी झाली आहे. तिचेही उद्घाटन मुख्यमंत्री यावेळी करणार आहेत.मुख्यमंत्र्यांचा दौरामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ एप्रिल रोजी हेलिकॅप्टरने मूल येथे येणार आहे. त्यांच्या हस्ते डॉ.शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे उदघाटन सकाळी ११ वाजता करण्यात येत आहे. तसेच स्मारक परिसरातील कर्मवीर मा.सां.कन्नमवार यांच्या पुतळयाचे ते अनावरण करतील. त्यानंतर १२ वाजता सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता मूल पंचायत समितीजवळ उभारण्यात आलेल्या सभामंडपात मुख्यमंत्री फडणवीस जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. मूल येथील या आयोजनाचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी आढावा घेतला.
आज कन्नमवार स्मारकाचे लोकार्पण
By admin | Published: April 04, 2017 12:43 AM