प्रशासनही सज्ज : उघड प्रचाराची रणधुमाळी तेजीतचंद्रपूर : चंद्रपुरात मनपा निवडणुकीसाठी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी १७ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता संपणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडे प्रचारासाठी आता केवळ काही तासांचा अवधीच शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार एकही क्षण व्यर्थ न दवडता मतदारांच्या संपर्कात राहत आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर २१ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा दक्ष राहून कार्य करीत आहे. पोलीस विभागही आपले कर्तव्य कसोशिने पार पाडत आहे. दुसरीकडे शहरात प्रचाराच्या रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. उल्लेखनीय असे की विदर्भातील सर्वाधिक तापमान आज रविवारी चंद्रपुरात नोंदविण्यात आले. ४५.८ अंश सेल्सीयस तापमान होते. या तारखेत मागील शंभर वर्षात एवढे तापमान नोंदविण्यात आले नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. असे असले तरी या तप्त उन्हात चंद्रपुरातील गल्लीबोळात विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवार आणि त्यांचे समर्थक फिरताना दिसून आले. १७ एप्रिलला सायंकाळी ६.३० वाजता प्रचाराची रणधुमाळी शांत होणार आहे. शहरातील बॅनर, फ्लेक्स, डीजीटल बोर्ड, झेंडे सोमवारी काढून टाकण्यात येईल. त्यामुळे सध्या या वस्तूंनी गजबजलेले शहर मंगळवारी वेगळेच दिसणार आहे. प्रचारासाठी अगदी काही तासांचा कालावधी शिल्लक असल्याने उमेदवार एकही क्षण न दवडता, दिवसभर प्रचारात गुंतून आहे. दरम्यान, उघड प्रचार बंद होत असल्याने आता शेवटचा पर्याय म्हणून मतदारांना खूश करण्यासाठी व मेजवान्या देण्यासाठी काही उमेदवारांकडून प्रयत्न केला जाऊ शकतो. यावेळी दारूही वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलीस विभागाने आपली यंत्रणा आणखी कडक केली आहे. कोणत्याही मार्गाने शहरात येणारी वाहने गांभीर्याने तपासली जात आहे. २४ तास ही तपासणी सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)सर्वच केंद्र आदर्श ठेवू -संजय काकडेचंद्रपूर मनपा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३६७ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व केंद्रे आदर्श मतदान केंद्रे म्हणून तयार करण्यात आली आहे. या केंद्रांवर सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जाणार असल्याची माहिती, मनपा आयुक्त संजय काकडे यांनी रविवारी मनपा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मतदानासाठी सर्व इव्हीएम मशीन मोहारबंद करून स्ट्रांग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मशीनबाबत संभ्रमावस्था असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही बाब अनाठायी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या निवडणुकीकरिता एकूण ४४० कंट्रोल युनिट व १२५८ बॅलेट युनिट निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रशासनाकडून १० टक्के मतदान पथके राखीव ठेवण्यात आले असून मतदान केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रावर दिव्यांग व्यक्तीकरिता व्हील चेअर, रॅम्प तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा, मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्राची रंगरंगोटी करून ते सुसज्ज करण्यात आली आहेत. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅटमिंटन हॉलमधून १८ एप्रिलला मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार असून त्याच दिवशी मतदान पथक रवाना करण्यात येत आहे, अशी माहितीही आयुक्त काकडे यांनी दिली.आचारसंहितेचे तीन गुन्हेमनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर या आचारसंहितेचे गांभीर्याने कसे पालन होईल, याकडे प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. आतापर्यंत तीन उमेदवारांवर आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त संजय काकडे यांनी दिली. मात्र संबंधित नावे व कागदपत्र जवळ उपलब्ध नसल्याने या उमेदवारांची नावे सांगण्यास त्यांनी यावेळी समर्थता दर्शविली.
आज थंडावणार प्रचार तोफा
By admin | Published: April 17, 2017 12:35 AM