भरगच्च कार्यक्रम : चंद्रपूरकरांना अभिजात संगीताची मेजवानीचंद्रपूर : स्नेहांकित प्रस्तुत प्रतिवर्षी आयोजित हिराई संगीत महोत्सव ४ व ५ फेब्रुवारीला चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयाच्या परिसरात होत आहे. सदर महोत्सवात नामवंत कलावंत हजेरी लावणार आहेत. शनिवारी सायंकाळी ६.३० ते ७ दरम्यान उद्घाटन सोहळा आयोजित असून त्यानंतर शंकर भट्टाचार्य आपले सरोद वादन सादर करतील. ते आकाशवाणीचे अ श्रेणीचे कलावंत आहेत. त्यानंतर आजच्या आघाडीच्या गायिका अर्चना कान्हेरे गायन सादर करतील.रविवारी सकाळी १० वाजता तडफदार महिला तबला वादक सावनी तळवलकर सोलो तबला वादन सादर करतील. त्या तालमणी सुरेश तळवलकर यांची नात आहेत. या सत्राचे दुसरे पुष्प सारेगमपचे विजेते गायक अनिरुद्ध जोशी गुंफणार आहेत.रविवारी सायंकाळी ७ वाजता समारोपीय सत्राचा प्रारंभ व्हायोलिन व तबल्याच्या जुगलबंदीने होणार आहे. रागीणी शंकर, सावनी तळवलकर या दोन तरुण महिला कलावंत चंद्रपुरात प्रथमच आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करतील. या स्वरोत्सवाची सांगता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक संजीव अभ्यंकर आपल्या मधूर गायनाने करतील. तिन्ही गायक कलावंतांना तबल्याची साथ उत्पल दत्ता व हार्मोनियमची साथ अनंत जोशी करतील.या महोत्सवादरम्यान बाबासाहेब उत्तरवार, ज्यांनी विदर्भात शास्त्रीय संगीत रुजवण्यासाठी तथा लोकप्रिय करण्यासाठी अमुल्य योगदान दिले, त्या बद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून अभिजात संगीतात प्रथम आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. श्वेता वेगड यांचादेखील अभिनंदनपर सत्कार आयोजित आहे. (शहर प्रतिनिधी)
आजपासून राणी हिराई संगीत महोत्सव
By admin | Published: February 04, 2017 12:37 AM