चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला. अनेकांचा यात बळी गेला. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाची दहशत कायम आहे. त्यातच तिसऱ्या लाटेसंदर्भात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आजपासून बाजारपेठ खुली ठेवण्यासाठी दोन तासांची सवलत दिली आहे. त्यामुळे आता सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल महिन्यामध्ये लाॅकडाऊन केले. केवळ जीवनावश्यक साहित्याचीच दुकाने सुरू होती. रुग्णसंख्या हळूहळू कमी झाल्यानंतर ७ जूनपासून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजारपेठेसह इतरही व्यवहार करण्यासाठी सूट दिली. यामुळे व्यापारी वर्गासह सामान्य नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. मागील पंधरा दिवस याच पद्धतीने बाजारपेठ सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्र्यांकडे बाजारपेठेची वेळ वाढवून देण्याची मागणी लावून धरली. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे प्रशासन तसेच पालकमंत्र्यांनी निर्बंधामध्ये आणखी सूट देत बाजारपेठेचा वेळ दोन तासांनी वाढवून दिला आहे. त्यामुळे आजपासून बाजारपेठ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र कोरोनाचा प्रत्येक नियम नागरिकांना पाळावा लागणार आहे. दरम्यान, शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू असून सामान्य नागरिकांची कामे सुरू झाली आहेत. मात्र आठवडी बाजार, शाळा, मंदिरे, वाचनालये आदी सुरू करण्याबाबत शासनस्तरावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने त्यावर निर्बंध मात्र कायम आहेत.
बाॅक्स
प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, सुरक्षित अंतर राखावे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र नागरिकांनी जवळच्या केंद्रावर कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
बाॅक्स
बाजारातील गर्दीवर नियंत्रण नाही
जिल्हा प्रशासनाने बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात सूट दिली आहे. आता तर वेळही वाढवून देण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही कोरोनाला मनावर घेतलेच नसल्याचे चित्र बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून येते. अनेक व्यावसायिक तसेच ग्राहकही मास्क न लावताच बिनदिक्कतपणे व्यवहार करीत आहेत. बहुतांश दुकानात सॅनिटायझर किंवा इतर साहित्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील लाट रोखणे कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सूट दिली असली तरी नागरिक, व्यावसायिकांनी त्याचा गैरफायदा घेणे आपल्याच जीवावर बेतण्यासारखे आहे.