विद्यार्थ्यांचे होणार स्वागत: पहिल्याच दिवशी मिळणार गोड जेवण चंद्रपूर : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश यावर्षीही शासनाने दिले आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे सदर कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यातील गुरुजी कामाला लागले आहेत.विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांमार्फत गाव तिथे शाळा उपलब्ध करून दिल्या आहे. विद्यार्थी या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शिक्षणाचे धडे आत्मसात करणाऱ्या बालकांचा पाया मजबूत झाल्यास त्या पायावर निर्माण होणारे त्याचे शैक्षणिक आयुष्य बळकट होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अनेक सकारात्मक उपाययोजना करूनही काही बाबींमध्ये शैक्षणिक गुणवत्ता कमी असल्याची वस्तुस्थिती दूर करण्यासाठी शासनाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने विशेष योजना राबविल्या जात आहे. असे असतानाही काही पालक आजही आपल्या पाल्याच्या साक्षरतेसाठी फारसे सतर्क असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सतर्क नसलेला पालक आणि त्यांच्या पाल्यांना शिक्षणाची आवड आणि महत्व पटावे, त्यांना आकर्षित करण्यासाठी शासनाने प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भात २६ जून रोजी पहिल्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शिक्षकवृंद पदयात्रेच्या माध्यमातून बालकांच्या घरी भेटी देणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवणाऱ्या बालकांना शाळेचे वातावरण आनंदी, समाधानी व उत्साहवर्धक वाटावे यासाठी शाळा परिसराची सडा टाकून स्वच्छता आणि रांगोळी, पाना-फुलांची तोरणे लावून शाळेचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.ध्वनिवर्धकावर देशभक्तीपर गीत वाजवून शाळेत येणाऱ्या बालकांच्या मनात देशाविषयीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शाळा सुरू होण्याच्या दिवशी सर्व शिक्षक वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत व कौतुक करणार आहे. याचदिवशी शालेय पाठ्यक्रमाचे मोफत वितरण केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातून बालकांचे तोंड गोड केले जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)
आज शाळांमध्ये प्रवेशोत्सव
By admin | Published: June 25, 2014 11:39 PM