तोहोगाव : मध्य चांदा वनप्रकल्प बल्लारशाहअंतर्गत येत असलेल्या तोहोगाव वनपरिक्षेत्रातील बहुतांश जंगल जळून खाक झाले आहे. आग नियंत्रणात येत नसल्याने जंगलातील रोपवन क्षेत्र, कटाई केलेले लांब बांबू, बांबू बंडल, कटाई केलेली लाकडे, बिट इत्यादी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी आगीत कक्ष क्रमांक ३३ मध्ये १०० च्या आसपास बिट जळाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे वनप्रकल्पाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चार फायर वाॅचरची नेमणूक केली आहे. परंतु, तोहोगाव वनपरिक्षेत्रात त्या फायर वाॅचरकडून बांबू बंडल बांधणे, जंगलात रोड तयार करणे अशा भलत्याच कामात गुंतविल्याने आगीकडे दुर्लक्ष झाल्याचे बाेलले जात आहे. याबाबत विचारणा केली असता वनपरिक्षेत्र अधिकारी मात्र सारवासारव करून बिट जळाले नसल्याचे सांगत आहेत.
कोट
तोहोगाव वनपरिक्षेत्रात आगीने रौद्र रूप धारण केले आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनकर्मचारी, फायर वाॅचर, रात्रंदिवस काम करीत आहेत. बांबू बंडल, लांब बांबू, बिट जळाले नाही.
- विनोद दासरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, तोहोगाव ता. गोंडपिपरी.