लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची. पण आता आसामनंतर फक्त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणाऱ्या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्सला पुरवू शकतो. आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे नवे दालन तयार होत आहे. पोंभुर्णा तालुक्यात विकासकामांसह रोजगार निर्मितीच्या दृष्टीने अनेक प्रकल्प आपण राबवित आहोत. मी विकास करतो, तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पोंभुर्णा येथे आयोजित टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबु हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिटच्या लोकार्पण सोहळयाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पंचायत समिती पोंभुर्णाच्या सभापती अलका आत्राम, पोंभुर्णा येथील नगराध्यक्ष श्वेता बनकर, पोंभुर्णा तालुका भाजपाचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार, नगरसेवक अजित मंगळगिरीवार, महाराष्ट्र बांबु विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे संचालक राहुल पाटील, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, पोंभुर्णा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विपिन मुद्दा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवावे, असे मला मनापासून वाटते. त्यादृष्टीने वाटचाल करीत आहोत. जंगल हे शाप की वरदान असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो, पण जंगल आपल्यासाठी नेहमीच वरदान ठरले आहे. जंगलाच्या माध्यमातून रोजगाराच्या वाटा आपल्याला गवसल्या आहे. पण केवळ रोजगारच नको तर देशभक्तीची भावना सुध्दा जागविण्याची आवश्यकता आहे. पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी महिलांची पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी ही महाराष्ट्रातील पहिली आदिवासी महिलांची संस्था ठरली आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्याने शंभर गावांमध्ये समृध्द शेतीचा प्रयोग आपण करीत आहेत. या मतदार संघातील अंगणवाडया आयएसओ प्रमाणित आदर्श करण्याची योजना आपण आखली आहे. पुढील सहा महिन्यात या मतदार संघात शंभर टक्के गावांमध्ये आरओ मशीन बसवून नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी आपण पुरविणार आहोत, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.प्रास्ताविकात बिआरटीसीचे संचालक राहुल पाटील म्हणाले, कॉमन फॅसीलिटी सेंटरमधून दोनशे तर टुथपिक प्रकल्पातून ६० ते ७० व्यक्तींना रोजगार मिळणार आहे. यातील वस्तू खरेदी करण्यासाठी थिंकफू कंपनीने तयारी दर्शविली आहे. अन्य मोठ्या कंपन्याही बांबूपासून तयार केलेल्या वस्तू खरेदीसाठी पुढे सरसावल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचेही भाषण झाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.स्वतंत्र एमआयडीसीला मान्यतापोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा आपण या भागातील नागरिकांना पुरविणार आहोत. पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर झाल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उमरी पोतदार येथे स्थानांतरीत करण्याचा निर्णयसुध्दा झालेला आहे. विकासाची ही प्रक्रिया अधिक गतीमान करण्याचा आपला मानस आहे, असे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
आसामनंतर आता पोंभुर्णा येथे टूथपिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:22 PM
आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची. पण आता आसामनंतर फक्त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणाऱ्या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्सला पुरवू शकतो. आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे नवे दालन तयार होत आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्राचे लोकार्पण