लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पट्टेदार वाघांचा मुक्तसंचार सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी किन्ही - मूरमाडी जंगलात एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. अशातच मंगळवारी कारगाटा-कच्चेपार जंगलालगत दोघांना पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. त्यांनी या वाघाचे छायाचित्रही काढले.प्रा. डॉ. बागलवाडे आणि प्रा. डॉ. बेदरे हे मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरीवरुन सिंदेवाहीकडे येत होते. दरम्यान, कारगाटा-कच्चेपार जंगलालगतच्या रस्त्याच्या बाजुला त्यांना एक पट्टेदार वाघ जाताना दिसला. पंधरा मिनिटे त्यांनी तिथेच राहून वाघाचे दर्शन घेतले. छायाचित्रही काढले. यासोबतच मंगळवारच्याच रात्री ९ वाजता सिंदेवाही येथील पाण्याच्या टाकीजवळ बिबट्याचे नागरिकांना दर्शन झाले. सिंदवाही तालुक्यात चारही बाजूने वाघ, बिबट यांचा मुक्तसंचार आजही सुरुच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. चार जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला वनविभागाने जेरबंद केले असले तरी तालुक्यात वाघ व बिबट फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.जाटलापूर, गडमौशी, चारगाव, डोंगरगाव, भेंडाळा, लाडबोरी परिसरात वाघाची दहशत आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातच सात पट्टेदार वाघ, तीन बिबट असल्याचे वनविभागाचे अधिकारी सांगत आहेत. कच्चेपार जंगलात वाघ असल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. दरम्यान, वनपरिक्षेत्रअधिकारी अरुण गोंड, क्षेत्रसहाय्यक जी.आर. करंडे यांनी कुठे वाघ दिसला तर तत्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन केले आहे.मागील एक महिन्यापासून किन्ही-मूरमाडी परिसरातील वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एसआयटीपीचे २० कर्मचारी तथा दंगा पथक मूरमाडी परिसरात तैनात केले होते. वाघ पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. हा वाघ जेरबंद झाला. मात्र आणखी दुसरे वाघ परिसरात येत असल्याने नागरिक पुन्हा दहशतीत आहेत.
सिंदेवाहीत पट्टेदार वाघाचे भ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 11:07 PM
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पट्टेदार वाघांचा मुक्तसंचार सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी किन्ही - मूरमाडी जंगलात एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आले. अशातच मंगळवारी कारगाटा-कच्चेपार जंगलालगत दोघांना पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. त्यांनी या वाघाचे छायाचित्रही काढले.
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये दहशत कायम : दोघांना पुन्हा वाघाचे दर्शन