राजकुमार चुनारकर
चिमूर (चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे पर्यटकांना हमखास वाघांचे दर्शन होते. त्यामुळे ताडोबात पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांचा हिरमोड होऊ नये म्हणून ताडोबा व्यवस्थापनाने कोअर झोन गेट व्यतिरिक्त बफर झोन क्षेत्र पर्यटकांसाठी खुले केले. त्यापैकी अलिझंझा बफर झोन गेट परिसरात सध्या बबली वाघिणीचे तीन बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. बबलीचे बछडे आपल्या आईचे दूध पितानाचे दृश्य पर्यटकांना बघायला मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
ताडोबाच्या चार प्रवेशद्वारांपैकी चिमूर तालुक्यातील कोलारा, रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटन सफारीसाठी पर्यटक पसंती देत आहेत. मात्र, बफर झोन परिसरात पर्यटक कोअरमध्ये प्रवेश मिळाला नाही तरच बफर झोनचा विचार करतात. आता वाघांनी आपला डेरा बफर झोन क्षेत्रात थाटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाच महिन्यांपूर्वी अलिझंझा परिसरात बबली वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. बबली वाघीण तीन बछड्यासह आता अलिझंझा प्रवेशद्वारावर पर्यटकांना आपल्या विविध छटांचे दर्शन देत आहेत.
याच गेट परिसरात भानुसखिंडी वाघिणीने बछड्यांना जन्म दिला. तसेच झरणी वाघीण, छोटा मटका याच परिसरात वास्तव्यात आहेत. झरणी, भानुसखिंडी वाघिणीने काहीकाळ आपल्या विविध छबी दाखविल्या. आता बबली वाघिणीचे तीन बछडे मोठे होत आहेत. हा बबलीचा परिवार पर्यटकांना सुखावून जात आहे. अलिझंझा गेटवरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना बबली आपल्या अनेक मुद्रांचे दर्शन देत आकर्षित करीत आहे. त्यामुळे अलिझंझा गेटला सुगीचे दिवस येणार असल्याचे गाईड, चालक सांगतात.
बछडे कॅमेऱ्यात कैद
चिमूर तालुक्यातील खडसंगी बफर झोनअंतर्गत येणाऱ्या अलिझंझा बफर झोनमध्ये पाच महिन्यांपूर्वी झरणीने तीन बछड्यांना जन्म दिला. चार महिने आपल्या दुधावर वाढवून तिने या तीन बछड्यांना बाहेर काढले. ते आता आईसोबत शिकारीचे धडे गिरवत आहेत. नुकतेच अलिझंझा गेट परिसरातील नवेगाव मेधो परिसरात पिलांना दूध पाजताना पर्यटकांना त्यांचे दर्शन झाले. बबलीच्या परिवाराला संदीप चौखे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.