चंद्रपूर : कोविड नियमावलीचा आधार घेत राज्य शासनाने बंद केलेली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन व सफारी २ फेब्रुवारीपासून म्हणजे बुधवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण घेतला आहे. मात्र ही सफारी आता कोविड नियम व अटी शर्तींचे पालन करूनच करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालकांना प्राप्त झाले आहे.
ताडोबाची सफारी करताना पर्यटक, मार्गदर्शक, जिप्सीवाहक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलेले असणे अनिवार्य आहे. कोविड लसीचे दोन डोस घेतलेले असले तरी दुसरा डोस घेऊन १४ दिवस होणे अपेक्षित आहे. ज्यांना लस घेण्यास मुभा नाही, अशांना मान्यताप्राप्त डाॅक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. सर्व प्रवेशद्वारांवर सामाजिक अंतर राखावे लागणार आहे. दोन वाहनांमध्ये १५ फुटांचे अंतर ठेवले जाणार आहे. प्रवेशद्वारावर गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. मास्क नसणाऱ्यांना १०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. यासह कोविडच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अटींवरच सफारीला परवानगी मिळालेली आहे.
कोविडच्या नियमांवर बोट ठेवून राज्य शासनाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी ११ जानेवारीपासून बंद केली होती. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता. तसेच पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या विविध घटकांवर याचा थेट परिणाम झाला होता. ही बाब लक्षात येऊन ताडोबा सफारी सुरू करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ताडोबा सफारी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. लोकलेखा समितीप्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्तावाला बळ दिले होते. अखेर शासनाने हा प्रस्ताव मान्य करीत सफारीला परवानगी दिल्याने पर्यटकांसह ताडोबात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
ताडोबालगतच्या पेंच प्रकल्पात सफारी सुरु होती. परिणामी ताडोबात येणारे पर्यटक पेंचमध्ये जात होते. यामुळे ताडोबातील रिसॉर्ट, ताडोबावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबाच्या रोजीरोटीचा बिकट प्रश्न निर्माण झाला होता. कोरोना नियमांचे पालन करून ताडोबातील पर्यटन सुरू करणे शक्य आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. तसेच ताडोबावर निर्भर असणाऱ्या लोकांनीही हाच आग्रह धरला होता. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निदर्शनास आणून दिली. त्यांनीही सकारात्मकरित्या २ फेब्रुवारीपासून कोरोनानियमांच्या अधीन राहून सफारीला मान्यता दिली.
- विजय वडेट्टीवार,
बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर.