बफर क्षेत्रात विखुरले प्लास्टिकअजिंक्य वाघमारे - दुर्गापूरहौसमौजेसाठी जंगलात भ्रमंतीसाठी जाणाऱ्या आणि तिथे ‘एन्जॉय’ करणाऱ्या हौशी पर्यटकांच्या आनंदामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील तृणभक्षी वन्य जीवांचे आयुष्य मात्र धोक्यात आले आहे. या परिसरात विखुलेले प्लास्टिक, स्टेपलर पिना लावलेले खाद्यपदार्थांचे कागदी खोके आणि पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स, काचेच्या बाटल्यांमुळे वन्यजीवांना धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.वने व वन्यजीव अमूल्य असा ठेवा असल्याने त्याचे जतन व संरक्षण करणे वनविभागाची जबाबदारी आहे. नागरिकांचीही यात तेवढीच जबाबदारी असली तरी, मात्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मोहर्ली वनपरिरक्षेत्रातील बफर झोनमध्ये दिसणारे चित्र चिंताजनक आहे. सदर प्रतिनिधीने या परिसरात झेरझटका मारला असता हे चित्र दिसून आले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पॉलिथीन पिशव्या आणण्यास मनाई असली तरी पर्यटक अश्या पिशव्यामध्ये सर्रास अन्न पदार्थ घेऊन येतात. ते खाल्यानंतर जंगलातच भिरकवले जाते. पर्यटकांना नियमांचा विसर पडला आहे. वनाधिकारीही कारणीभूत दिसत आहेत. पद्मापूर वन उपज तपासणी नाक्यावर पर्यटकांची वाहने नोंदणीसाठी थांबतात. या प्रवेशद्वारावर जंगलात सक्तीने पाळावयाच्या नियमाची नियमावली दर्शविणारे फलक कुठेच दिसत नाही. भ्रमंतीसाठी येणारे पर्यटकही सोयरसूतक नसल्यासारखे वागत असल्याने माहितीदर्शक फलक उभारणे गरजेचे आहे. याशिवाय तसे तोंडी निर्देश देण्याचीही सोय असणे आवश्यक आहे. मात्र गेटवरील कर्मचारी याची दक्षता घेताना दिसत नाहीत. परिणामत: अलिकडे जंगलात ठिकठिकाणी शेकडो पॉलिथीनच्या पिशव्या, दारुच्या बाटला, खर्ऱ्याच्या पॉलिथीन्स विखुरल्या आहेत. पर्यटकांनी फेकून दिलेल्या पॉलिथीनमध्ये अथवा अन्नाच्या रिकाम्या खोक्यांमध्ये बरेचदा अन्न शिल्लक राहते. तृणभक्षी प्राण्यांचा वावर बफर झोनमध्येही मोठ्या प्रमाणावर असल्याने यातील अन्न अथवा खाद्यपदार्थ या प्राण्यांकडून खाल्ले जाण्याची शक्यता असते. यात त्यांच्या पोटात प्लास्टिकही जाण्याची भीती असते. अन्नाच्या रिकाम्या खोक्यांसोबत वन्यप्राण्यांच्या पोटात खोक्याला लावलेल्या स्टेपलर पिना, टाचण्या जाण्याची शक्यता अधिक आहे. याचा परिणाम त्यांच्या पचन संस्थेवर होऊ शकतो. हे प्राणी अन्य मांसाहारी प्राण्यांकडून शिकार झाल्यास त्यांच्याही पोटात टाचण्या, पिना जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका वेळीच लक्षात घेण्याची गरज आहे.वन्यजीव आपआपल्या भक्ष्याच्या शोधात सर्व जंगल पिंज़ून काढतात. मांसभक्षी प्राणी तृणभक्षींचा पाठलाग करून शिकार करतात. या पळापळीत दोन्ही वन्यजीवांना काचा रुतून दुखापत होऊन ते दगावण्याचीच शक्यता असते. या वनातील वैभवांची सर्वोतोपणी काळजी घेणे व त्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र वनविभाग आणि पर्यटकांकडूनही चुका घडत असल्याचे उघडकीस आले.
पर्यटकांच्या एन्जॉयचा वन्यजीवांना धोका
By admin | Published: January 06, 2015 10:56 PM