शंकरपूर : डोमा येथील मुक्ताई मंदिर परिसरातील निसर्ग सौंदर्य सध्या पर्यटकांचे मन मोहून घेत आहे. तेथील धबधब्यात भिजून चिंब होण्याचा आनंद काही औरच ठरत आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआप तिकडे ओढली जात आहेत. शंकरपूरजवळ हिरव्या वनराईने नटलेला मुक्ताई डोंगर आहे. येथेच माना समाजाचे जागृत देवस्थान मुक्ताई मंदिर आहे. या मंदिरात मोठ्या भक्तीभावाने पूजाअर्चा केली जाते. लगतच्या डोंगराच्या ४५ फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे. या भागात निसर्गाने अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट, बंदराचा हुपहुप आवाज आणि पाण्याचा सळसळणारा आवाज पर्यटकांना मनसोक्त आनंद देत आहे. याच धबधब्यावर सूर्याचे किरण पडल्यानंतर दिसणारा इंद्रधनुष्य डोळ्यांचे पारणे फेडतो. धबधब्याच्या बाजूला एक गुहा आहे. ही गुहा धबधब्यापासून वरती डोंगरावर जाते. त्यातून जाताना शरिराला नागमोडी वळण घेत जावे लागते. त्याचाही आनंद पर्यटकांना मिळतो. मुक्ताईच्या निसर्ग सौंदयाचा आनंद घेण्यासाठी लांब अंतरावरील पर्यटकांची खूप मोठी गर्दी दररोज होत आहे. पावसाचा जोर आणखी वाढत चालला, त्याप्रमाणे धबधबा जोरकसपणे कोसळत आहे. त्या धबधब्याचे तुषार चेहऱ्यावर पडताच एक वेगळीच चमक येते. लहान मुलांपासून ते आबाल-वृद्धापर्यंत सर्वच या धबधब्याचा आनंद घेत आहे. (वार्ताहर)हुल्लड पर्यटकामुळे त्रास४पर्यटक येथे येतात. आनंदही घेतात. पण काही दारूडे पर्यटक मात्र हुल्लडबाजी करीत असतात. या हुल्लडबाजीमुळे मात्र तिथे भांडण होत असते. त्यामुळे आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हिरमूस होवून परत जावे लागत आहे.
मुक्ताई धबधबा खुणावतोय पर्यटकांना
By admin | Published: July 12, 2016 1:58 AM