बल्लारपूर : आधीच कोरोनाच्या विषाणूने नागरिक त्रस्त आहेत. आता बल्लारपूर येथून बामणीमार्गे गडचांदूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून रस्त्यावर उडणाऱ्या व पडणाऱ्या स्लजच्या विषारी धुळीने अपघाताची शक्यता बळावली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा ट्रकवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बाहेरून आलेल्या एसीएस ट्रान्सपोर्ट कंपनीचे १५पेक्षा अधिक ट्रक बल्लारपूर येथून गडचांदूर येथील सिमेंट कंपनीला ट्रकमध्ये स्लज भरून पोहोचविण्याचे काम करतात. परंतु ताडपत्री बरोबर झाकत नसल्यामुळे स्लजची धूळ रस्त्याने उडत जाते. यामुळे ही धूळ श्वसनामार्फत फुफ्फुसात जाऊन आरोग्यास धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. हवेत उडणारी स्लज नागरिकांच्या डोळ्यात जाते. स्लज ही विषारी असल्यामुळे डाेळे निकामी होण्याचा गंभीर धोका वाढला आहे. स्लज पडत जाणाऱ्या ट्रक मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.