रवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई व उमा या नद्या वाहतात. या नद्यांवर जिल्ह्याची तहान व सिंचन अवलंबून आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाली हे खरे असले तरी या उद्योगांची वक्रदृष्टी जिल्ह्यातील जीवदायिन्यांवर पडली आहे. जिल्ह्यातील नद्यांमध्ये विष ओतण्याचे काम उद्योग सातत्याने करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे मोठे जलस्रोतही आता प्रदूषित होऊन मानवी आरोग्याला बाधित करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणारी वर्धा नदी जणू नागरिकांपेक्षा उद्योजकांचेच पोट भरण्यासाठी अस्तित्वात आली असावी, असे एकंदरीत परिस्थिती पाहता दिसून येते. वरोरा, बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील पॉवर कंपन्या, सिमेंट कंपन्या याच नदीवर अवलंबून आहे. या नदीतील मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा या कंपन्या करतात. आणि राक्षसी परतफेड करतात. आपल्या कंपनीतील रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात असल्याने वर्धासारखी मोठी नदीही दूषित झाली आहे. वेकोलि प्रशासनानेही या नदीवर वाट्टेल तसा अत्याचार केला आहे. इरई नदीचीही तीच परिस्थिती करून टाकली आहे. या नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले होते. त्यानंतर सातत्याने अनेक संघटनांनी इरई नदी वाचावी म्हणून आंदोलने केली. मात्र प्रशासनाला कधी जाग आली नाही. आता मागील वर्षीपासून या नदीचे पात्र रुंद करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र प्रदूषणाची समस्या कायमच आहे. पेपरमीलमधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. झरपट नदी तर पूर्वी चंद्रपूरची जीवनदायिनी होती. मात्र या नदीचा डोळ्यादेखत नाला करून टाकला आहे. झरपट नदी वाचविण्यासाठी एकाही राजकीय नेत्याने वा प्रशासकीय अधिकाऱ्याने धडपड केली नाही. उलट ती प्रदूषित करणाऱ्यांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शहरातील ज्या भागात नदीच्या प्रवाहाने स्पर्श करून पवित्र केले, तेथील पावित्र्य कायम न राखता सांडपाणी नदीत सोडण्यात आले. याशिवाय शहरातील सुमारे ६० टक्के मलवाहिन्या झरपटमध्येच विलीन करून स्थानिक राज्यकर्त्यांनी संपूर्ण नदीचे वाटोळे केले आहे. झरपट झाली गटारगंगा१५ कि.मी. एवढी कमी लांबी असतानाही झरपट नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. उलट नदीची गटारगंगा कशी करता येईल, याचाच पध्दतशीर प्रयत्न झाला. या नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. पात्रातील बारीकसारिक खडकंही गायब करण्यात आले. आता तर नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळूच दिसत नाही. वाळूऐवजी चिखल, घराघरातून आणि नालीतून आलेल्या मळाचे साम्राज्य दिसते. पालिका, मनपाद्वारे होणारे प्रदूषणनगरपालिका, महानगरपालिकाद्वारे सोडण्यात येणारे सांडपाणी नद्यांमध्येच जाते. याशिवाय घनकचऱ्यामधूनही जलस्रोत दूषित होते. रोगजंतू (बॅक्टेरिया, व्हायरस), रासायनिक पदार्थ, डिटर्जंट, तेल, ग्रिस, विषारी पदार्थ, औषधी, मानव विष्ठा, कॅडनियम, झिंक, पारा, कॉपर, लीड, आर्से, निक, सेलेनियम यासारख्या पदार्थामुळे जलस्रोत दूषित होत आहे. वेकोलि आणि पॉवर प्लांटमधील प्रदूषित घटकवेकोलिच्या कोळसा खाणीतून निघणारे अॅसीड, मायीन ड्रेनेज, आॅईल, ग्रिस, मातीतील धातू, कोळसा, गंधक, नायट्रेटस आदी घटक जलस्रोत दूषित करीत आहेत. यासोबतच महाऔष्णिक वीज केंद्र आणि इतर पॉवर प्लांटमधून निघणारे राख, राखेतील जड धातू, कॅडनियम, झिंक, पारा, कॉपर, लीड, आर्सेनिक, सेलेनियम, गंधक इत्यादी घटक पाण्यात मिसळून जलप्रदूषण वाढत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्तव्य काय?प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाचे कार्यालय आणि त्यातील अधिकारी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत आहेत, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. वायू प्रदूषणासोबतच जलप्रदूषणाचेही स्वरुप भयंकर झाले आहेत. तरीही याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही सोयरसूतक असल्याचे आजवर कधीच दिसले नाही. कारवाई करायला तक्रारीची प्रतीक्षा करणाऱ्या या खात्याकडून आता नागरिकांच्याही अपेक्षा राहिल्या नाहीत.दमदार आंदोलनाची उणीवजिल्ह्यात नानाविध संस्था सामाजिक कार्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रदूषित जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. विविध मुद्यांवर या संस्थांनी आजवर आंदोलने केली आहेत. मात्र जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आणि प्रदूषणामुळे त्यांची होत असलेली वाताहात त्यांना अंतर्बाह्य अस्वस्थ करीत नाही. त्यामुळेच यासाठी एकही संस्था दमदार आंदोलन उभे करू शकली नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडला जातो. मात्र वाहती नदी डोळ्याआड करून तिचे वाटोळे होत असतानाही जीवनदायिनींना वाचविण्यासाठी प्रशासनाला गदगद हलविले जात नाही. बोटावर मोजण्याएवढ्या एकदोन जणांनी आपआपल्या परीने थोडेफार प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना पुढाऱ्यांची आणि प्रशासनाची फारशी साथ मिळाली नाही.मलवाहिन्या झरपटमध्ये विलीनशहरातील बंगाली कॅम्प, तुकूम, अंचलेश्वर गेट, संतोषी माता मंदिर परिसर, ताडबन परिसर, हनुमान खिडकी परिसर, पठाणपुरा वॉर्ड या भागातील सांडपाणी नदीत सोडले जाते. मच्छिनाल्याचेही काही पाणी रामाळा तलावात जाते आणि बाकी सर्व पाणी झरपट नदीतच मिसळते. याशिवाय शहरातील कचरा, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्याही नदीतच टाकल्या जातात. विशेष म्हणजे, शहरातील सुमारे ६० टक्के मलवाहिन्या पूर्वीपासून झरपट नदीतच विलीन करण्यात आल्या आहेत. या नदीत प्राणवायूचे प्रमाण अत्यंत कमी आणि सल्फेट, हेवी मेटल अशा घातक रसायनाचे प्रमाण अधिक आढळून आले होते. अर्थात, कोणत्याही परिस्थितीत झरपट नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही, हे स्पष्टच आहे. असे असताना महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आंघोळीसाठी याच पाण्याचा आधार घ्यावा लागतो.
उद्योगांच्या रसायनयुक्त पाण्याने नद्या विषारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2017 12:34 AM